रायगड : पावसामुळे नागरिकांना रेशनधान्य आणण्यासाठी जाता येत नाही. ही अडचण ओळखून राज्यशासनाने तीन महिन्याचे धान्य जुन महिन्यातच वितरीत केले होते. हे धान्य आता संपून गेले. त्यातच महत्वाच्या सणासाठी नेहमीप्रमाणे दिला जाणारा आनंदाचा शिधा देखील मिळणार नसल्याने अतीगरीब वर्गातील नागरिकांना गौरी-गणपतीचा सण रेशन धान्यविनात साजरा करावा लागणार आहे.
दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना 100 रुपयात महत्वाच्या सणानिमित्ताने आनंदाचा शिधा वितरीत केला जातो. या शिधामध्ये रवा, साखर, चणाडाल, पामतेल, मैदा अशा पाच जिनसा दिल्या जातात. सणानिमित्ताने मागील तीन वर्षापासून आनंदाच्या शिधा कीटचे वाटप केले जाते. येथील गोरगरीब कुटुंबिय या कीटच्या वितरणाची वाट पहात असतात; परंतु यंदा आनंदाचा शिधा वाटप केला जाणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून दिली जात आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यात मोफत शिधा मिळणार नाही.
जुलै, ऑगस्ट महिन्याचा मोफत शिधा जूनमध्ये वाटण्यात आलेला आहे. हा शिधा संपून गेल्याने अनेक कुटुंबिय आनंदाच्या शिधा केव्हा वाटप करणार याची वाट पहात होते. सणासाठी आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे जाहीर करत पुरवठा विभागाने गोरगरीब नागरिकांना मोठा धक्का दिला आहे.
याबाबत रायगड जिल्हा रास्त भाव दुकानदार कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले की, कोकणात गौरी-गणपती उत्सव गोरगरीबांपासून श्रीमंताच्या घरात साजरा केला जातो. त्यामुळे या सणासाठी आनंदाचा शिधा मिळावा, अशी अपेक्षा नेहमी धरली जाते. यावर्षी आनंदाचा शिधा मिळणार नाही, असे जाहिर केल्याने नाराजी आहे. शासनानेही यंदा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तीन महिन्याचे धान्य एकदाच वाटले. उपक्रम चांगला होता; परंतु त्याचा नकलत फटका गोरगरीबांना बसत आहे. पुढील वर्षी त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे.
तीन महिन्याच्या धान्यवाटपात गोंधळ?
तीन महिन्याचा एकत्र शिधा वाटपाची जिल्ह्यात पुरेशी यंत्रणा नाही. तीन महिन्याचे धान्य एकत्र साठवण्याची गोदामांची कमतरता, वाहतुकीसाठी अपुरे वाहने, दुकानांमध्ये धान्य साठवण्यासाठी अपुरी जागा अशा अनेक समस्याने धान्य वाटपात गोंधळ उडाला होता. 13 जूनपर्यंत केवळ 15.2 टक्के वितरण झाले होते. ऑगस्ट पर्यंत या आकडेवारीत फारशी सुधारणा झाली नव्हती. तरीही शंभरटक्के वितरण झाल्याचा दावा पुरवठा विभागाकडून केला जात आहे. पुरवठा विभागाच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना बसला होता.
फक्त 21 गोडावून कार्यरत
जिल्ह्यात 1452 रेशन धान्य दुकाने आहेत. कमीत कमी जागेत असलेल्या या दुकानांमध्ये साठवणुकीची सुविधा नाही. अगदी 10 बाय 10 फुटाच्या दुकानात हे दुकानदार धान्य साठवून ठेवतात व तेथेच विक्री करतात. अशा परिस्थितीत तीन महिन्याचे धान्य साठवून ठेवणे या दुकानदारांना शक्य होत नाही. काही दुकाने ही कच्च्या इमारतीमध्ये असल्याने पावसाळ्यात गळती लागून धान्य खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दुकानदार धोका पत्कराण्यास तयार नाहीत.
पुरवठा विभागाची जिल्ह्यात 66 गोडावून आहेत, परंतु त्यांचीही दुरवस्था झालेली असल्याने केवळ 21 गोडावून सध्याच्या परिस्थितीत कार्यरत आहेत. पावसाळ्यात तीन महिन्यासाठी धान्य साठवून ठेवणेही या गोडावूनमध्ये शक्य होत नसल्याचे जिल्ह्यात वितरणासाठी धान्यच शिल्लक रहात नाही.
तीन महिन्याच्या धान्य वितरणाचे विश्लेषण
एकूण शिधापत्रिका: 4,56,028
अंत्योदय : 80,602 शिधापत्रिका, लोकसंख्या - 2,51,661
प्राधान्य कुटुंब : 3,75,426 शिधापत्रिका , लोकसंख्या - 15,10,673
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे तीन महिन्याचे धान्यवाटप शंभर टक्के झालेले आहे. सप्टेंबर महिन्यातील धान्यवाटप गणपती सणानंतर केली जाणार आहे. आनंदाचा शिधा यंदा गौरी-गणपतीच्या सणासाठी करण्याचे कोणतेही नियोजन नाही.सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड