नागोठणे : महेंद्र माने
पावसाळा म्हटले की, लोकांना आकर्षण होते ते वर्षा सहलीचे, धबधब्यांचे. आपल्या रायगडमध्ये फिरण्या जोगे असे अनेक धबधबे आहेत. परंतु, बहुतेकांना माहीत नसलेला सुरक्षित धबधबा म्हणजे गंगावणे - बेणसेवाडीचा धबधबा.
नागोठणे-पोयनाड रस्त्यावर असलेल्या या धबधब्याकडे नागोठणे व पोयनाडकडून जाता येते. नागोठणेपासून 8 की.मी. व पोयनाडकडून 20 ते 22 कि.मी.वर रिलायन्स कॉलनीजवळ असलेल्या बेणसेवाडी गावात उतरल्यानंतर पश्चिमबाजूकडे गावातून थोडे पुढे गेल्यानंतर एक आदिवासीवाडी लागते. या ठिकाणी आपण जर एखादे वाहन आणले असेल तर तेथे सुरक्षित ठेऊ शकतो किंवा दुचाकी वाहन आणल्यास पुढे ओढ्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो.
आदिवासी वाडीवर राहत असलेल्या लोकांची घरे, तेथील स्वच्छता, त्यांचे राहणीमान पाहण्याजोगे आहे. त्याच्या उजव्या बाजूच्या शेतवाटेवरून आजूबाजूचे भातशेती पाहत आपण एका ओढ्या जवळ येतो. तेथे आल्यानंतर खळखळणारा ओढा पाहून तेथे डुबण्याची इच्छा होते. पुढे टेकडीवर गेल्यावर तेथून रिलायन्स कंपनी व आजूबाजूची शेती व निसर्गरम्य सौंदर्य पाहून मन प्रसन्न होते. पुढे जंगलातून जात असता छोटासा दुसरा ओढा पार केल्यानंतर एका पाऊलवाटेने जात असताना वनविहाराचा आनंदही लूटता येतो.
थोडे वर गेल्यानंतर समोरच उंच कड्यावरून धोधो कोसळणारा धबधबा व त्याखाली असलेली सुरक्षित जागा. यामुळे आपण धबधब्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकतो. धबधब्याकडे येताना किंवा जाताना वाटेत कोठेही थांबून वनभोजन करण्याची मजा काही औरच असते. असा हा कुटुंबियांसह मनाजोगे आनंद लुटता येणारा सर्वच बाजूने सुरक्षित धबधबा आहे.
धबधब्याकडे शक्यतो पावसाळा चालू झाल्यानंतर लगेच जाऊ नये कारण वरून येणारे मातीमिश्रित लाल पाणी तसेच वरून एखादा दगड खाली पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या ओढ्यावर जास्त पाणी असेल तर धबधब्याकडे जाण्याचे टाळावे. ओढे पार करताना शेवाळीवरून जाऊ नये. धबधब्यावर गेल्या नंतर जास्त पाऊस आल्यास शक्यतो लवकर निघावे, कारण खाली ओढ्याला पाणी वाढल्यास आपण ओढा पार करू शकत नाही.
आदिवासीवाडीतील घरे व त्यांचे राहणीमान, भातशेतीमधून जाणारा रस्ता, खळखळून वाहणारा ओढा, टेकडीवरून दिसणारे निसर्गरम्य सौंदर्य, वनविहार व वनभोजनाचा आनंद, कुटुंबियांसह मनाजोगे आनंद लुटता येणारा सुरक्षित असा गंगावणे - बेणसेवाडीचा धबधबा.