माथेरान (रायगड) : मिलिंद कदम
माथेरानचा यावर्षीचा पर्यटन हंगाम गणपती विसर्जना बरोबरच संपणार असून आता वेध लागले आहे ते येणाऱ्या पुढील पर्यटन हंगामाचे. परंतु यावर्षीच्या हंगामामध्ये माथेरान प्रशासनाने येथील पर्यटन वाढीकरता केलेले दुर्लक्ष असेच सुरू राहिल्यास येणाऱ्या काळामध्ये माथेरानचा पर्यटक इतरत्र जाऊ शकतो. त्यामुळे पुढील पर्यटन हंगामामध्ये प्रशासन कशा पद्धतीने सुविधा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
माथेरानमध्ये मार्च ते १५ जून हा महत्त्वाचा पर्यटन हंगाम मानला जातो परंतु मागील काही वर्षांमध्ये येथील पावसाळी पर्यटन बहरले असून पावसाळा हाच मुख्य हंगाम म्हणून समोर आला आहे, जून महिन्यापासून गणपतीपर्यंत माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या कोविड नंतर कमालीची वाढली आहे. तीन साडेतीन महिन्यात पाच लाखापेक्षा अधिक पर्यटक दाखल झाल्याने येथील व्यावसायिक आनंदी आहे, परंतु आलेल्या पर्यटकांना
सुविधा देण्याकरता पालिका प्रशासन कमी पडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामध्ये प्रामुख्याने येथे येणारा घाटरस्ता, वाहनतळाची गैरसोय, शौचालयांची दुरवस्था, पाण्याची सोय उपलब्ध नाही, रस्त्याची दुरवस्था या प्रमुख समस्या आहेत.
यावर्षी माथेरान मध्ये १५ मे पासून पाऊस सुरू झाला, तो अजूनही कोसळत आहे, पाऊस संपल्यानंतर येथील व्यवसायिक पुढील हंगामाच्या तयारीला लागतात परंतु नगरपालिका प्रशासन मागील वर्षाच्या चुका येणाऱ्या हंगामात सुधारणार का असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. नगरपालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी येथे प्रशासकीय राजवट आहे व प्रशासन आपल्या अधिकारांमध्ये येथील समस्या सोडवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
घाट रस्ता, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, दिवाबत्तीची सोय, पर्यटकांना आवश्यक शौचालय, पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांकरिती नगरपालिका काय करणार हे महत्त्वाचे आहे. स्थानिक पर्यटनावरच अवलंबून असल्याने येथील पर्यटक सुविधा महत्वाच्या आहेत.