पनवेल : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमतेच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने १० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शुद्धीपत्रकानुसार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत ही वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
गौरी विसर्जन तसेच सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आणि काही अंशी सुरू होणाऱ्या परतीच्या प्रवासाचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामध्ये जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीअॅक्सल वाहने, ट्रेलर, लॉरी आदींचा समावेश आहे.
परिवहन विभागाने यापूर्वी ७ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन आदेशातील परिच्छेद क्रमांक ३ मध्ये आता सुधारणा केली आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळातील वाहतूक नियमनाबाबतची सुधारित वेळापत्रक स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची मोठी गर्दी आणि महामार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांना परिस्थितीनुसार जड-अवजड वाहनांवरील निर्बंध शिथील करण्याबाबत त्यांच्या स्तरावर योग्य निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
तसेच जेएनपीटी आणि जयगड बंदरातून होणारी आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी आवश्यक वाहतूक नियोजन करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांच्या वाहतुकीला प्राधान्य देतानाच बंदरांशी संबंधित अत्यावश्यक मालवाहतुकीवर परिणाम होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होते. त्यातच अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहिल्यास वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.