पेण : गणेशमूर्ती विविध पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये सुरक्षितपणे पॅक करून पाठवल्या जातात. इन्सेट पर्यावरणपूरक गणेशमूर्ती. 
रायगड

Pen Ganesh Idols | पेणमधील चार लाख गणेशमूर्तींच्या निर्यातीचा ‘समुद्र प्रवास’ सुरू; मे अखेरपर्यंत गणेशमूर्ती परदेशात पोहोचणार

, जेएनपीए बंदरातील कोंडी सुटल्याने गणेश मूर्तिकार सुखावले

पुढारी वृत्तसेवा

पेण; जयंत धुळप/कमलेश ठाकूर : रायगड जिल्ह्यातील पेणमधील गणेशमूर्तींचा परदेशातील समुद्री प्रवास सुरू झाला आहे. दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात सुरू होणारी ही निर्यात यंदा आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे काही काळ रेंगाळली होती. मात्र, आता मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएमपीए) बंदरातील वाहतूक कोंडी सुटल्याने गेल्या महिनाभरापासून बाप्पाच्या मूर्ती विविध देशांकडे मार्गस्थ होत आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुमारे चार ते साडेचार लाख गणेशमूर्ती परदेशात पोहोचतील, असा विश्वास पेणमधील गणेशमूर्तिकारांनी व्यक्त केला आहे.

पेण तालुक्यात सद्यस्थितीत 500 पेक्षा अधिक गणेशमूर्ती कार्यशाळा कार्यरत असून, येथे दरवर्षी एकूण 15 ते 16 लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. या अवाढव्य गणेशोत्सव व्यवसायातून पेण तालुक्यात प्रतिवर्षी सुमारे 100 ते 150 कोटी रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल होते. या व्यवसायावर स्थानिक अर्थव्यवस्था, मूर्तिकार आणि हजारो कारागिरांचे कुटुंब अवलंबून आहे. या मूर्ती कच्च्या माती आणि शाडू मातीपासून बनवलेल्या (पर्यावरणपूरक) असतात. अमेरिका, जपान, थायलंड, रशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि भूतान या देशांमध्ये या पारंपरिक, सुबक आणि पर्यावरणस्नेही मूर्तींनाच परवानगी असते. उर्वरित 11 ते 12 लाख मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार केल्या जातात.

युद्धस्थितीमुळे निर्यातीला बसला होता ब्रेक

गेल्या दोन महिन्यांपासून आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जेएनपीए बंदरावर मोठा ताण आला होता. कंटेनर निर्यात बंद होती. मालाची वाहतूक आखाती देशांच्या मार्गाने होत असल्याने बंदरामध्ये जहाजांची आणि कंटेनर्सची प्रचंड कोंडी (ट्रॅफिक जाम) झाली होती. याचा थेट फटका गणेशमूर्तींच्या निर्यातीला बसला. युद्धस्थिती थोडी शिथिल झाल्यानंतर, गणपतीमुर्तींचे कंटेनर स्वीकारण्यास प्रारंभ झाला आणि महिन्याभराच्या विलंबाने बाप्पाच्या मूर्तींसाठी जेएनपीएचे मार्ग खुले झाले.

सुरक्षेची परिपूर्ण काळजी आणि पॅकिंग

परदेशात जाणार्‍या गणेशमूर्तींची निर्मिती पेणमधील कार्यशाळांमध्ये जवळपास पूर्ण झाली आहे. समुद्रमार्गे प्रवास करताना मूर्तींना कोणताही धक्का लागू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. पुठ्ठ्यांचे बॉक्स, कागद आणि कागदाचा सुका लगदा वापरून या मूर्ती अत्यंत सुरक्षितपणे पॅक केल्या जातात. या बॉक्सवर संबंधित देशाचे नाव टाकून ते टेम्पोद्वारे जेएनपीटी बंदरात पाठवले जातात. तेथे एका मोठ्या कंटेनरमध्ये सुमारे 5 ते 6 हजार मूर्ती व्यवस्थित रचून त्या जहाजाद्वारे मार्गस्थ केल्या जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT