कमलेश ठाकूर
पेण : अमेरिका, इराण, इस्त्रायल यांच्यातील युद्धजन्य स्थितीचा फटका यंदा गणेश मूर्तींनाही बसला आहे. इंधनासह अनेक वस्तू महागल्यामुळे बाप्पाच्या मूर्तीदेखील महागणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी तयार करण्यात येत असलेल्या गणेशमूर्तींच्या किमतीत २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय गणेश मूर्तिकारांनी घेतला आहे. इंधनासह वाहतूक, प्लास्टिक, रंगांचे साहित्य महागल्याने ही दरवाढ केली जात आहे.
युद्ध स्थितीमुळे डिझेल, गॅस आदी कच्चा माल महागला. पर्यायाने गणेशमूर्ती व्यवसायावरही त्याचा परिणाम होत आहे. मूर्ती कलेसाठी परदेशातून रंगांचे साहित्य, प्लास्टिक, मूर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जवळपास ३० टक्क्यांनी महागला आहे. पेणमधील शेकडो मूर्तिकारांनी २५ टक्के दरवाढीचा निर्णय आतापासून जाहीर केला आहे. यापूर्वी मिळणारे पेंटिंगचे साहित्य प्लास्टिक कव्हर पिशवी पॅकिंग- टेप अशा सगळ्याच वस्तू महागल्या आहेत. गणेशमूर्ती वाहून नेणाऱ्या वाहनांना लागणारे इंधनही महागले आहे.
पेणमधील कारखान्यांतून लाखो गणेशमूर्ती परदेशामध्ये निर्यात होतात. तर चार लाखांहून अधिक गणेशमूर्ती संपूर्ण भारतात जातात. तथापि, युद्ध स्थितीमुळे पेट्रोल, डिझेल, व्यावसायिक गॅसचे दर वाढले. पर्यायाने वाहतुकीचा खर्चही वाढला. पूर्वी कर्नाटक, राजस्थान, अहमदाबादला जाणाऱ्या वाहनांना एकावेळी दहा हजार रुपये खर्च यायचा, पण आता १३ हजारांवर खर्च येत आहे.