यंदाही गणेशभक्तांचा प्रवास होणार खड्ड्यातूनच pudhari photo
रायगड

Ganpati festival road condition : यंदाही गणेशभक्तांचा प्रवास होणार खड्ड्यातूनच

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची निघण्याची तयारी; तीन हजारांहून अधिक वाहने मार्गावरून धावण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग :बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमानी कोकणासह रायगड जिल्ह्यात येण्याच्या तयारीला लागले आहेत. काही जण खासगी वाहनांने तर काही जण एसटी महामंडाच्या बसने प्रवास करणार आहेत. मात्र, मुंबई-गोवा महामार्गासह अलिबाग- रोहा, साळाव, तळेखार, तसेच ग्रामीण रस्त्यावरील खड्डे कायमच आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मुसळधार पावसाने हे खड्डे अधिकच खोल झाले आहेत. त्यामुळे यंदाही गणेश भक्तांंचा प्रवास खड्ड्यातून होणार असल्याचे दिसून येत आहे.

कोकणासह रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव सण थाटामाटात साजरा केला जातो. यंदा जिल्ह्यामध्ये 1 लाख दोन हजार 484 गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमान्यांची रायगडसह कोकणात निघण्याची तयारी सुरु झाली आहे. काहीजण दोन दिवस तर काहीजण पाच दिवसांची सुट्टी काढून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रायगड व कोकणात येणार आहेत. मुंबई, ठाणे, बोरीवली, खार, विरार, वसई अशा अनेक ठिकाणी नोकरी, व्यवसायानिमित्त असणारे हजारो चाकरमानी येणार आहेत.

बुधवारी (दि.27) गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे रविवारपासून चाकरमानी गावी येण्याची शक्यता आहे. मुंबई- गोवा महामार्ग क्रमांक 66 व पाली फाटा (खोपोली) वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 या मार्गावर गणेशभक्तांच्या वाहनांची वर्दळ असणार आहे. तीन हजारांहून अधिक वाहने या मार्गावरून धावण्याची शक्यता आहे. परंतु, मुंबई गोवा महामार्गावरील चार पदरीकरणाचे काम गेल्या 14 वर्षापासून रखडले आहेत.

अनेक राजकीय नेत्यांची आश्वासने, आंदोलने, पाहणी दौरे झाले तरीदेखील अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. चार पदरीकरणाचे काम अपूर्ण स्थितीत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता शोधावा लागत आहे. नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून एका वर्षात कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. नागोठणे पासून अवेटीपर्यंतच्या रस्त्यासह मुंबई- गोवा महामार्गावरील पनवेल ते पेण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

अलिबाग-रोहा मार्गावरील वेलवली खानाव ते उसर तसेच साळाव ते तळेखार रस्त्यावर तर कार्लेखिंड ते रेवस मार्गावर खडड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणारे 50 किलो मीटरचे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आठवड्याभरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसात खड्डे खोल झाले आहेत. गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येणार्‍या चाकरमान्यांचा त्रास यंदाही कायम असल्याचे चित्र आहे.

चाकरमान्यांच्या नशीबी तेच खड्डे

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामामुळे नव्याने केलेल्या काँक्रीट रस्ताही दरवर्षी पावसाळ्यात खड्डयात जात आहे. सरकारच्या या ढिसाळ कारभाराने चाकरमान्यांच्या नशिबी तोच रस्ता, तेच खड्डे, अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT