अलिबाग (रायगड) : रमेश कांबळे
गावात एकोप्याचे वातावरण राहावे यासाठी 'एक गाव एक गणपती' उपक्रम काही गावांमध्ये अनेक वर्षांपासून राबवला जातो; परंतु या उपक्रमाला हळूहळू कमी प्रतिसाद मिळत आहे. यंदा पोलिसांनी 'एक गणपती' साठी सर्व गावांना आवाहन केले; परंतु आगामी निवडणुका लक्षात घेऊन काही नेतेमंडळींनी मंडळांना वर्गणी दिल्यामुळे 'एक गणपती' उपक्रमाला गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला. यंदा ९ गावात 'एकच गणपती' संकल्पना राबविली.
राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विविध व्यक्ती, संस्था, विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक विषयांचे जतन करणारे उपक्रम राबवावेत, असा उद्देश आहे.
गावात एकच गणपती बसवल्यामुळे मिरवणुका, डीजे, बॅनर, कमानी अशा अनावश्यक खर्चाला फाटा देत विविध प्रबोधनाचे व मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन करता येते. त्यातून उत्सवाचा खरा उद्देश साध्य होतो.
जिल्ह्यात ८१० ग्रामपंचायती आहेत. तंटामुक्त गाव योजनेत एक गणपती उपक्रमाला गुण असल्यामुळे अनेक गावे सहभागी होत होती; परंतु नंतर योजनाच कागदावर राहिली. हळूहळू गावांची संख्या कमी होत गेली. यंदा ९ गावांत एक गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे.