रायगड : आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे, म्हणून शासनाने आंबिया बहार फळपिक विमा योजना सुरू केली आहे. प्रति हेक्टरी 14 हजार 450 रुपये विमा हप्ता जिल्ह्यासाठी आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्हयात हा हप्ता सात हजार रुपये इतका असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रायगड जिल्हयातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक विमा हप्ता का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी गुंठावारी असून बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांच्या जमीनी एकरामध्ये आहेत. शासनाच्या नियमावलीमुळे शेतकऱ्यांचे हाल आणि विमा कंपन्या मालामाल अशी परिस्थिती दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये अलिबाग, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, माणगांव, म्हसळा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते. जिल्ह्यामध्ये 17 हजार हेक्टर इतके आंब्याचे क्षेत्र असून, 13 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे.
जिल्ह्यात 56 हजारहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा बसत आहे. शेतकऱ्यांना फळपीक विम्यातून आर्थिक बळ मिळावे यासाठी सरकारने पुर्नरचित हवामान अधारित फळपिक विमा योजना सुरू केली आहे. अंबिया बहार ही योजना सुरू केली.
मुंबई येथील युनिव्हर्सल सम्पो जनरल इन्शुरन्स, कंपनीची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामान प्रतिकुल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रति हेक्टरी 14 हजार 450 रुपये विम्याचा हप्ता ठरविण्यात आला आहे.
उत्पादनक्षम फळबागांसाठी विमा संरक्षण लागू राहणार आहे. यासाठी आंबा पिकाचे उत्पादनक्षम वय पाच वर्षे असणे आवश्यक आहे. फळ पिकासाखील कमीत कमी दहा गुंठे असणे आवश्यक आहे. एक डिसेंबर ते 31 मे या कालावधीत अवकाळी पाऊस व कमी- जास्त तापमान, वेगाचा वारा आदीचा फटका बसल्यास एक लाख 70 हजार रुपये तसेच गारपिटचा फटका बसल्यास 57 हजार रुपयांची विमा संरक्षित रक्कम दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे, यासाठी राबविण्यत आलेली योजना चांगली असली, तरी या योजनेसाठी असणारा विमा हप्ता भरमसाठ असल्याची माहिती समोर येत आहे. हा विमा हप्ता कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयासाठी सात हजार विमा हप्ता आहे. तर रायगडसाठी 14 हजार विमा हप्ता ठेवण्यात आला आहे. हा रायगडच्या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आहे. या बाबत जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली आहे. आगामी काळात पाचही जिल्ह्यासाठी आंबा फळपिक विमा हप्ता एकच ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचा पाठपुरावा सुरू केला आहे.चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ