श्याम लोखंडे
Raigad Heavy Rain
खांब : मुंबई- गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडवरील पाणी कोलाड, आंबेवाडी नाक्यावरील बाजारपेठेत आणि दुकानांत शिरले. कुंडलिकेचा डावा तीर कालवा ओहळ उलटून पाणी शिरले. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. आंबेवाडी, वरसगाव येथे डोंगर माथ्यावरून पाण्याचा लोंढा आल्याने घरात पाणी शिरले. महामार्गावरील अर्धवट सुरू असलेल्या गटार लाईन, सर्व्हिस रोड आणि मेन चौकातील उड्डाण पूलाच्या कामामुळे ठिकठिकाणी भरपूर पाणी साचले आहे.
त्यामुळे काही मार्गावर पाणी आले तर काहींच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे खूप नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी केली जात आहे. तर अतिवृष्टीमुळे शाळा, माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .
रोहा तालुक्यात गेली आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पावसाने हजेरी लावली. सोमवारी अधिक जोर धरत संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला. आज (दि.१५) सकाळी मुसळधार पावसामुळे डोंगरदऱ्यातील नाले आणि नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गोदी नदीच्या कालव्याचे पाणी कोलाड, आंबेवाडी नाक्यावरील बाजारपेठेतील सर्व्हिस मार्गावर साचून राहीले. तसेच कोलाड - रोहा मार्गावरील मेन चौकात पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.
खांब परिसरात रस्त्यावर पाणी आले तर महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे हे पुराचे पाणी येथील लोकवस्तीत नरेंद्र जाधव, महादेव सानप, समीर म्हात्रे, दत्ता चितळकर आदी ग्रामस्थांच्या घरात शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू तसेच लाकडी फर्निचर व काही किंमती वस्तूंचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने याची दखल घेत नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी केली आहे.
सुट्टीचा संदेश सकाळी साडेनऊच्या सुमारास शैक्षणिक संस्थांना मिळाला. तोपर्यंत अनेक विद्यार्थी शाळा गाठण्यासाठी घरातून निघाले होते. काही विद्यार्थ्यांनी मुसळधार पावसात शाळेपर्यंत प्रवासही केला होता. त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापनांची मोठी तारांबळ उडाली. पालकांनी ही सुट्टी पूर्वसूचना स्वरुपात शाळा सुरु होण्याआधी देण्यात यायला हवी होती, अशी नाराजी व्यक्त केली जात होती.
मुंबई - गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई झाल्याने मागील अनेक वर्षांपासून काम रखडले आहे. उड्डाण पुलासाठी करण्यात आलेला भराव, निकृष्ट दर्जाची गटारे, काही ठिकाणी स्लॅब कोसळून गटार लाईनत पडलेले आहेत. त्यामुळे पाणी साचून राहिले आहे. पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी.चंद्रकांत लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते