उरण: नवी मुंबईतील एनआरआय आणि टी. एस. चाणक्य या अत्यंत महत्त्वाच्या फ्लेमिंगो तलावांसह ठाणे जिल्ह्यातील आठ जलाशयांना पाणथळ दर्जा नाकारल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
ठाणे जिल्हा पाणथळ समितीने या तलावांबाबत काढलेल्या निष्कर्षांवर पर्यावरणवाद्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने हे पाऊल उचलले असून, या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नॅटकनेक्ट फाउंडेशन या संस्थेने जिल्हा समितीच्या अहवालाला आव्हान देत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. समितीने संबंधित जलाशयांना पाणथळ म्हणून घोषित करण्यास नकार दिला होता, जो निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि वैज्ञानिक निकषांना डावलणारा असल्याचा दावा संस्थेने केला आहे.
या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने हे प्रकरण पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे पुढील चौकशीसाठी वर्ग केले आहे. नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले की, राज्य वन विभागाच्या नोंदीनुसार ही क्षेत्रे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या उपपरिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत.