दोन महिन्यानंतर मच्छिमारी नौका सज्ज pudhari photo
रायगड

Coastal fishing restart : दोन महिन्यानंतर मच्छिमारी नौका सज्ज

किनार्‍यावर मच्छिमार, खलाशांची लगबग; 1 ऑगस्टपासून मासेमारी

पुढारी वृत्तसेवा

उरण : राजकुमार भगत

दोन महिन्यांपासून समुद्रापासून दूर असलेल्या दर्याचा राजाच्या म्हणजेच कोळी बांधवांची समुद्रात जाण्याच्या प्रतिक्षा आत्ता संपली असून 1 ऑगस्ट पासून मच्छिमारांच्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी झेपावणार आहेत. खलाशी आणि मच्छिमार यासाठी तयारीला लागले असून बोटींची रंगरंगोटी, तेल आणि इतर तयारी करण्यात सध्या मच्छिमार व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या दोन तिन दिवसात मत्स्य खवय्यांसाठी भरपूर ताजी आणि स्वस्त मासे उपलब्ध होणार आहेत.

1 जून ते 1 ऑगस्ट या दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते. मच्छिमार बांधव देखिल या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत. या दोन महिन्याच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरूस्ती,रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात. या वर्षी जाळी दुरूस्तीसाठी आणि शिवण्यासाठी स्थानिक कारागिर मिळत नसल्याने करजा बदरात यावर्षी 400 मजूराना आंध्रप्रदेशातून बोलावण्यात आले होते.

या बंदीच्या दोन महिन्यांत त्यांनी ही आपली कामे पुर्ण केली असून आत्ता मोठ्या आनंदात, गाणी गात आपल्या होड्या घेउन साता समुद्रा पलिकडे मच्छिमारी करता झेपावणार आहेत. प्रशासनाकडून 1 जून ते 31 जुलै असा बंदी कालावधी ठरवण्यात आला होता. हा बंदीचा कालावधी संपला असून 1 ऑगस्टपासून या मच्छिमारी नौका पुन्हा एकदा समुद्रात मासेमारीसाठी जाणार आहेत. याच वेळी मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या पर्ससीन बोटी ऑगस्ट ते नोहेंबर या कालावधीत मच्छिमारीसाठी तयार झाले आहेत.

यावर्षी रायगड जिल्ह्यात मच्छिमारी बोटी बुडाल्याच्या दोन दुर्घटना घडल्या. बंदी काळात मच्छिमारी करणे हे या मच्छिमारांच्या जीवावर बेतले. खांदेरी येथे करंजा येथिल बोट बुडाल्याने त्यामध्ये तीन खलाशांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह तीन दिवसानंतर वेगवेगळ्या ठिकाणी लागले होते.जीवावर उदार होउन मासेमारी करून आपली उपजिवीका करणार्‍या मासेमारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. 15 लाखाच्या वर कुटूंबे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत.

करंजा, मोरा, दिघोडा किनार्‍यावर दोन महिने शाकारून ठेवलेल्या नौका आत्ता खलाशांनी गजबजून गेल्या आहेत. 10-12 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा सोबत घेवून मच्छिमार समुद्रात कुच करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या बोटी सुरूवातीला ससून डॉक, भाउचा धक्का येथे जावून बोटींमध्ये डिझेल आणि बर्फ भरतील नंतर 1 ऑगस्ट पासून ते मच्छिमारीला सुरूवात करतील. पहिल्या वेळेला लवकर म्हणजे 5-6 दिवसांनी ते मच्छि घेवून किनार्‍यावर येतील त्यानंतर 10-12 दिवसांनी त्यांची फेरी होईल.
भारत नाखवा, मच्छिमार, करंजा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT