मच्छीमारांना नवीन हंगामाचे वेध pudhari news
रायगड

Murud Beach | मुरुडच्या किनार्‍यांवर हुप्पा, हय्या,....हो...अशा आरोळ्या

मच्छीमारांना नवीन हंगामाचे वेध, 1 ऑगस्टपासून होड्या लोटणार समुद्रात

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा : दोन महिने कमाई विना बसून असलेल्या मच्छीमार बांधवांना आता नवीन हंगामाचे वेध लागले आहेत. 1 ऑगस्टपासून समुद्रात होड्या लोटण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सध्या मुरूडच्या किनार्‍यावर हय्या, हय्या....हो.हो हो...अशा आरोळ्या कानावर पडू लागल्या आहेत.

होड्यांची डागडुजीसह अन्य बारीक सारीक कामे पूर्ण करण्यासाठी मुरुडच्या मच्छीमारांची लगबग सुरु झाली आहे.

परंतु पुढील चार दिवस समुद्रात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने कोळी बांधव चिंतेत आहेत. सर्वात महत्वाचा मासेमारीचा पहिला हंगामाला उशीर होत आहे. देवाकडे समुद्राला शांत होण्याची आर्जव करण्यासाठी मुरुड कोळीवाड्यात पूजन अर्चा करतात.यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला.जुलै महिन्याच्या शेवटचा आठवड्यात पाऊस नसतो, वारा, वादळ कमी होते. परंतु या वर्षी 27 जुलै उलटला तरी पाऊस, वारा थांबत नाही म्हणून कोळी बांधव चिंतेत आहे.

मगच होड्या समुद्रात सोडतात...

गेल्या 12/13 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. आतापर्यंत 2,121 मि. मी . पावसाची नोंद झाली असुन शनिवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. कोळी समाज हा धार्मिक परंपरा जपणारा आहे. समुद्रात होड्या लोटण्यापूर्वी मल्हार मार्तंड देवाला कौल लावण्याचा प्रघात आहे. समुद्रात भरपुर मच्छी मिळू दे आणि नुकसान टळू दे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. तसेच शुभमुहूर्त काढून पूजाअचर्चाही केली जाते. मगच होड्या समुद्रात सोडल्या जातात.

खवळलेल्या समुद्राच्या पाण्याला करंट असल्याने किती नौका निघतील याचे अनुमान लावणे तुर्तास कठीण असले तरी नेमक्याच मोठ्या नौका मुहूर्त काढून मच्छिमारी साठी जाणार आहेत . ूर्वतयारी म्हणून जाळी भरणे, खलाशांची जमवाजमव, डिझेल, बर्फ, अन्न धान्य भरून तयारी काही मच्छीमारांनी चालविली आहे. समुद्र किनारी जाळी विणणे, होड्यांना तेल पाणी, डागडुजी , रंग लावणे , बोर्ड रंगवणे आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत.

तालुक्यात 750 मच्छीमार

मुरुड तालुक्यात राजपुरी, एकदरा, मुरुड, मजगाव, दांडा, काशिद, बोर्ली, कोर्लई, साळाव व चोरढे मिळून 750 हून अधिक मासेमारी नौका चालकांनी दोन महिने शासन आदेशाप्रमाणे पूर्णपणे मच्छीमारी बंद ठेवली आहे. गेल्या 3/4 वर्षां पासून समुद्रातील हवामान बिघडल्याने तुफान, वादळाचा सामना करतांना मत्स्यव्यवसाय आर्थिक नुकसानीत आहे. परिणामी या व्यवसायातील लोकांना खुपच संघर्ष करावा लागल्याचे चित्र आहे. मत्स्य प्रजनन काळात खोल समुद्रातील मच्छिमारी बंद असल्याने किनार्‍यालगत जवळा, कोळंबी, बोईटे आदी बारीक मासळीवर उपजिविका होत नसली तरी थोडा फार हात लागत आहे.

मासेमारी बंदी काळात मच्छीमारांनी केलेला खर्च वाया जातो. मायबाप सरकार आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी मदत करते. अशा स्वरूपात मच्छीमार बांधवांना देखील अशा परिस्थितीत आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून मदत करावी.
- मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड मच्छीमार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT