अलिबाग : पुढारी वृत्तसेवा
अलिबाग बाजारपेठेत असणाऱ्या हिरा भरत स्वीटमार्टला आज (शुक्रवार) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अलिबाग नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूच्या दुकानांना या आगीची झळ बसली नाही.
लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आगीत दुकानातील संपूर्ण सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण आगीमध्ये जीवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांची वित्त हानी झाली आहे. अलिबाग बाजारपेठेत असणाऱ्या हिरा भरत स्वीटमार्ट या दुकानाला सकाळी आग लागली. यामुळे त्यावेळी त्या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी तातडीने नागरपरिषदेच्या अग्निशमन दलाला कळविले. काही क्षणातच त्या ठिकाणी अग्निशमन दलाची यंत्रणा पोहोचली.
अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुकानाला लागलेली आग विझविण्यात यश आले. आग वेळेत विझविल्याने शेजारी असणाऱ्या दुकानदारांनी सुटकेचा निश्वास सोडला. आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी कपडे, किराणा, सोने अशी दुकाने आहेत. त्याचबरोबर या परिसरात लोकवस्तीदेखील आहे.
आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान दुकानाला लागलेली आग दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याला असलेल्या विद्युतवाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची चर्चा घटनास्थळी होती.