रायगड : ऐन गणेशोत्सवात जिल्ह्यात साथरोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पावसाळ्यात निर्माण झालेली अस्वच्छता, दूषित अन्नपाणी, डास-कीटक आणि बदलते हवामान यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. त्यातच आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा झाल्याने प्रत्येक घरी लहान-मोठ्या व्यक्तींना ताप, सर्दी, कोरडा खोकला, डोकेदुखी, जुलाब, उलट्या अशा साथीच्या आजाराची लागण होत आहे.
स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून घरात व आजूबाजूला स्वच्छता ठेवा. डासांची पैदास होऊ नये म्हणून पाणी साठू देऊ नका. उकळलेले पाणीच प्यावे, झाकून ठेवलेले अन्नपदार्थ वापरावे, असे आवाहन सतत नागरिकांना करण्यात येत आहे. शाळा, बाजारपेठ, गणेश मंडळे येथे स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दररोज फवारणी व तपासणी होत आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्याने हलकासा ताप, अंगदुखी, कणकण आल्यास दुर्लक्ष करू नये. घरगुती उपचाराऐवजी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, व्हायरल फिवर, टायफाइडसारख्या आजारांचे रुग्ण वाढले. ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो व अतिसाराचे रुग्ण अधिक. शहरी भागात डेंग्यू-चिकुनगुनियाचे रुग्ण नोंदवले जात आहेत. मोठ्या गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता व हात धुण्याचे नियम पाळावा, दूषित पाणी, उघड्यावरचे खाद्यपदार्थ टाळावेत. रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटा, औषधे तर व कर्मचारी उपलब्ध आहे, असे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात येते. सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी, खाद्य पदार्थांची रेलचेल यामुळे आजाराचा प्रादर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
डेंग्यू - अंगात तीव्र वेदना, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, रक्तस्रावाची लक्षणे
मलेरिया - थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, गॅस्ट्रो
अतिसार - उलट्या, जुलाब, अशक्तपणा
टायफाईड - ताप सतत राहणे, भूक मंदावणे
घरामध्ये आठ दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेवू नका. घर आणि परसातील स्वच्छता राखा. रिकाम्या टाक्या उघड्या ठेवू नका. लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.डॉ. शीतल जोशी, अतिरीक्त शल्य चिकीत्सक जिल्हा रुग्णालय