महाड : महाड तालुक्यातील वरंध या गावांमध्ये मागील काही दिवसापूर्वी एका 84 वर्षीय वृद्धाला दगडाने मारहाण झाली होती. या संपूर्ण प्रकरणानंतर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी नितीन धनावडे याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी देखील आरोपीवर कारवाई झाली नाही.
आरोपी नितीन धनावडे याला अद्यापही अटक झाली नाही. आरोपी हा शिंदे गटाचा पदाधिकारी आहे. माझे वडील वसंत धनावडे हे 80- 90 च्या दशकामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी होते. आत्ताचे मंत्री भरत शेठ गोगावले यांना त्यावेळेस पंचायत समितीला अपक्ष निवडून आणण्यामध्ये माझ्या वडिलांचा सिंहाचा वाटा होता. असे उदाहरण देत माझ्या वडिलांना न्याय कोण देणार असे बोलत योगेश धनावडे यांनी खंत व्यक्त केली आहे.
सदरच्या माराहणीमध्ये माझ्या वडिलांचा एक डोळा निकामी झाला असून जर माझ्या वडिलांना योग्य तो न्याय मिळाला नाही तर मी येत्या काही दिवसात महाड प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा योगेश धनावडे यांनी दिला आहे.