रायगड

वादग्रस्‍त विधान करणार्‍यांचा समाचार घेतलाच पाहिजे : डॉ. नीलम गोर्‍हे

अविनाश सुतार

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : भारतीय सैन्यांचे अनंत ऋण आहेत. ते कुणालाही विसरता येणार नाही. घरापासून दूर राहून देशसेवा करताना त्यांच्या आठवणी मनात काहूर माजवत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण आदर्श मानतो. त्यांच्याबद्दल जर कोणी अपशब्द उच्चारत असेल, तर त्यांचा तिथेच समाचार घेतला पाहिजे, असे परखड मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी मांडले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि पनवेल संघर्ष समितीने अंजूमन इस्लामच्या काळसेकर महाविद्यालयाच्या सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय सैन्य, आदर्श प्राध्यापक, उत्कृष्ट मुख्याध्यापक आणि पनवेल अर्बन बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. नीलम गोर्‍हे बोलत होत्या.

याप्रसंगी माजी मंत्री आ. आदिती तटकरे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. बाळाराम पाटील, उद्धव ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन पाटील, माजी आ. मनोहरशेठ भोईर, पनवेलचे प्रांताधिकारी रवींद्र मुंडके, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुरदास गोवारी, सुदाम पाटील आदी उपस्थित होते.

आडनाव कडू असले तरी कार्य गोड

कार्यक्रमाचे संयोजक कांतीलाल कडू, तुमचे आडनाव कडू असले, तरी तुमचं कार्य गोड आहे. त्यामुळे तुमच्या आडनावाचा थोडासा पुनर्विचार करायला हरकत नाही, अशी मिश्किल टिप्पणी डॉ. गोर्‍हे यांनी करताच सभागृहात हास्याचे कारंजे उडाले. खरं तर सत्कार कितीही केले तरी सैनिकांचे आपल्यावर इतके उपकार आहेत, की सत्कार कमी पडतील, अशी कृतज्ञता गोर्‍हे यांनी व्यक्त केली.
माजी मंत्री आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले. कांतीलाल कडू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT