महाड: पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील वाळण विभागामधील पंधेरी गावच्या हद्दीत वसलेल्या वाळण कुंड येथील देवी वरदायनी माता मंदिराच्या परिसरात दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या भल्या पहाटे साडेपाच वाजता दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेल्या तीन वर्षापासून ही परंपरा सुरू असून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात देवी वरदायनी मातेचा हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी देवीचा जागर गोंधळ देखील घालण्यात आला.
वाळण कुंड येथे वरदानी मातेचे वास्तव हे पुरातन काळापासून असून देवी वरदानी माता ही "हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी" अशी ख्याती आहे. वाळण कुंडात मोठमोठ्या माशांचे थर असून या माशांच्या रूपामध्ये देवी वर्धा यांचे वास्तव असते, असे सांगितले जाते.
ग्रामस्थांकडून सुरू करण्यात आलेल्या या दीपोत्सवाला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या परिसरात सोयी सुविधा करण्याची मागणी भाविकांमधून होऊ लागली आहे.