पनवेल : पनवेल महापालिकाद्दीतील भटक्या श्वान व मांजराचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून करण्यात आलेले सर्वेक्षणनुसार 19,307 भटके श्वान आणि 5080 भटक्या मांजरीची नोंदणी केली आहे. या प्राण्यांना स्वतःची ओळख देण्यासाठी आधार कार्डच्या धर्तीवर ओळखपत्र तयार करण्यात येणार आहेत. याकरता पनवेल महानगरपालिकेकडून स्वतंत्र ॲप निर्माण करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात आले आहेत. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या पाठबळाच्या आधारावर याबाबत तयारी सुरू करण्यात आली आहे.
पशूंसाठी आधार कार्ड देण्याबाबतचा प्रकल्प, ज्याला पशुधन आधार किंवा यूआयडी फॉर ॲनिमल्स असेही म्हटले जाते, हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याचा मुख्य उद्देश पशुधनाची ओळख पटवणे, त्यांच्या आरोग्याचा मागोवा घेणे आणि पशुपालकांना मदत करणे हा आहे.प्रत्येक पशुधनाला एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो, जसा माणसांना आधार कार्डवर असतो.
या क्रमांकामुळे प्रत्येक प्राण्याचे वय, लिंग, जात, आरोग्य स्थिती आणि मालकाची माहिती एका केंद्रीय डेटाबेसमध्ये नोंदवली जाते.पशुधनाच्या लसीकरणाची आणि आरोग्याच्या नोंदी ठेवणे सोपे होते.साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते.यामुळे पशुधन विम्याचा लाभ घेणे सोपे होते, कारण प्रत्येक प्राण्याची अचूक ओळख असते.सरकारच्या विविध योजनांचा लाभ गरजू पशुपालकांपर्यंत पोहोचवणे शक्य होते. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने पावले उचलले आहेत.
ओळख मिळाल्यानंतर हा फायदा होणार
श्वान व मांजरांचे निरंतर सर्वेक्षण आणि नोंदणी आणि पशुवैद्यकीय रेकॉड करणेकामी यंत्रणा
प्राणी जन्म नियंत्रण केंद्रा संबधीत व्यवस्थापन
भटक्या श्वान व मांजरांच्या लसीकरण नोंदणी करिता यंत्रणा
भटक्या श्वान व मांजरांची काळजी घेणारे स्थानिक प्राणीप्रेमी आणि स्वयंसेवक यांची नोंदणी करणेकामी मदत होईल
ॲप आधारित हे फायदे होणार
1. निरंतर सर्वेक्षणाव्दारे भटक्या श्वान व मांजरांची संख्या समजून येणार आहे .
2. भटक्या श्वान व मांजरांच्या लसीकरणा करीत लागणाऱ्या मनुष्यबळ,आर्थिक खर्च याचा अंदाज वर्तवण्यात येईल .
3. प्राणी जन्म नियंत्रण नियम नुसार भटक्या श्वान व मांजरांच्या निर्बिजीकरण संख्येत वाढ होईल.
4. निर्बिजीकरण शस्त्रक्रिया न झालेल्या भटक्या श्वान व मांजराच्या संख्या निर्बिजीकरणाकरीता लागणाऱ्या मनुष्यबळ आणि आर्थिक खर्च याचा अंदाज वर्तवण्यात येईल.
5. भटक्या श्वान व मांजरांचे काळजी घेणारे स्थानिक प्राणीप्रेमी आणि स्वयंमसेवक यांची नोंदणी झाल्यास निर्बिजकरण, लसीकरण मोहीमेला वेग येईल आणि रेबिज रोगास आला घालण्यास मदत होईल.
आधार कार्डच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्राण्यांना ओळख दिली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भटक्या पशु वर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. प्राथमिक स्तरावर याबाबत हा उपक्रम प्रस्तावित आहे. याकरता महापालिका आयुक्त सकारात्मक आहेत. निविदा मागून यासंदर्भात प्रशासन पावले उचलणार आहे.डॉ. मधुलिका शेटये-लाड, पशु शल्यचिकित्सक, पनवेल महापालिका