माणगाव : कमलाकर होवाळ
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवे पंख देणारा दिघी-पुणे पर्यायी मार्ग सध्या केवळ ‘समन्वया अभावी अडलेला स्वप्नमार्ग’ ठरला आहे. श्रीवर्धन जवळील दिघी बंदर ते पुणे या अंतराला गती देणारा, वेळ व खर्चाची मोठी बचत करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ 6 ते 7 किमी अपूर्ण रस्त्यामुळे रखडल्याचे वास्तव समोर आले आहे.
दोन जिल्ह्यांच्या सीमा रेषेवर उभा असलेला हा अपूर्ण टप्पा म्हणजे विकासाच्या महामार्गातील ‘बॉटलनेक’ ठरत असून, रायगड आणि पुणे प्रशासनातील समन्वयाचा अभाव या प्रकल्पाच्या गतीला निर्णायक अडथळा ठरत आहे. या नव्या मार्गामुळे सुमारे 25 ते 30 किमी अंतर कमी होणार आहे. त्यामुळे पर्यटक नागरिक व प्रवाशांना पश्चिम महाराष्ट्र पुणे- रायगड हे अंतर कमी वेळेचे व सुलभ प्रवासासाठी राहणार आहे.
दिघी बंदर ते पुणे हा प्रवास सुलभ करण्यासाठी दोन पर्यायी मार्ग प्रस्तावित करण्यात येत आहेत. पहिल्या पर्यायात मुळशी -वाघेवाडी ताम्हिणी परिसरात पूल व डोंगरवाडी ताम्हिणी दरम्यान बोगदा उभारण्याचा प्रस्ताव असून, यामुळे सुमारे 30 किमी अंतराची बचत अपेक्षित आहे. दुसरा आणि अधिक प्रभावी पर्याय म्हणजे माणगाव बोरवाडी - चाच - कुंभे कुंभ्याची वाडी घोळ पानशेत पुणे हा मार्ग पूर्ण झाल्यास तब्बल 25 ते 30 किमी अंतर कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि किफायतशीर होऊ शकतो. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांनी मावळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात याच रस्त्याचा उल्लेख करीत तो रस्ता करण्याचे आश्वासन ग्रामस्थ व नागरिकांना दिले होते.
या मार्गातील बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी घोळ या गावा पर्यंतचा सुमारे 7 किमीचा टप्पा अद्याप अपूर्णच आहे. यातील 4 किमी भाग रायगड जिल्ह्यात, तर 3 किमी भाग पुणे जिल्ह्यात येतो. मात्र, दोन्ही जिल्ह्यांतील बांधकाम विभागांमध्ये तसेच दोन्ही जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात अपेक्षित समन्वय नसल्यामुळे हा छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा दुवा अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही.
परिणामी, हजारो कोटींच्या विकासाला गती देणारा प्रकल्प कागदावरच अडकून पडला आहे. वास्तविक ताम्हिणी घाटावरील ताण कमी करण्यासाठी व विकासात्मक दृष्टीकोनातून विचार केला तर हा शॉर्टकट मार्ग सर्वांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. सध्या ताम्हिणी घाट हा कोकण-पुणे दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. मात्र, अरुंद रस्ता, तीव्र वळणे, धोकादायक उतार आणि वारंवार होणारे अपघात यामुळे ताम्हिणी घाट हा मार्ग प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतो. हा नवीन पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास ताम्हिणी घाटावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल अशी प्रवासी पर्यटकांची मागणी आहे.
आर्थिक विकासाचा ‘केंद्रबिंदू
सुमारे 38 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विकसित होणारे दिघी बंदर हे कोकणातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प ठरत आहे. 6 हजार एकर क्षेत्रावर उभारणारा हा प्रकल्प अभियांत्रिकी, औषध निर्माण, रासायनिक, वस्त्रोद्योग आणि अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देणार आहे. परंतु या बंदराच्या यशस्वीतेसाठी मजबूत आणि जलद रस्ते जोडणी अत्यावश्यक आहे. पुणे व पश्चिम महाराष्ट्राशी थेट संपर्क झाल्यास लॉजिस्टिक्स, व्यापार आणि उद्योगांना मोठी गती मिळू शकते.
पर्यटन, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना या नवीन मार्गामुळे मिळणार असून श्रीवर्धन, महाड दिवेआगार, हरिहरेश्वर, दिघी बंदर, आणि दक्षिण कोकणातील पर्यटनाला नवे आयाम मिळतील. त्यामुळे नजीकच्या काळात कुंभेपानशेत परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊन रायगडच्या आर्थिक विकासाची नांदी ठरेल. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, शेतीला बाजारपेठ, तसेच वाहतूक खर्चात बचत अशा अनेक सकारात्मक परिणामांची अपेक्षा व्यक्त होत आहे. भूतकाळात ताम्हिणी घाट मार्ग उभारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनिक समन्वय निर्णायक ठरला होता.
आजही त्याच धर्तीवर ठोस निर्णय घेतल्यास हा प्रकल्प अल्पावधीत पूर्ण होऊ शकतो. ‘7 किमी’ अंतरातील रस्ता पूर्ण झाला तर ‘विकासाचा महामार्ग’ दोन जिल्ह्याच्या प्रगतीचा मार्ग ठरणार आहे. दिघी-पुणे शॉर्टकट हा केवळ एक पर्यायी रस्ता नसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यटन विकासाचा कणा ठरण्याची क्षमता बाळगत असून केवळ 67 किमी अपूर्ण रस्त्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प रखडलेला आहे.नवीन मार्गामुळे श्रीवर्धन, महाड आणि दक्षिण कोकणातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल, तर कुंभे-पानशेत परिसर पर्यटन केंद्र म्हणून नव्याने उदयास येण्याची शक्यता आहे. सुरक्षित आणि कमी वेळेत होणारा प्रवास पर्यटकासाठी आकर्षण ठरणार असून दोन जिल्ह्यातील आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. इतिहासात ताम्हिणी घाट मार्गासाठी जसा राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनिक समन्वय निर्णायक ठरला, तसाच समन्वय आज आवश्यक आहे. केवळ 7 किमीचा दुवा पूर्ण झाला तर दिघी-पुणे शॉर्टकट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा खरा ‘गेमचेंजर’ ठरू शकतो.
दिघी-पुणे पर्यायी मार्ग पूर्ण झाल्यास सुमारे 25 ते 30 किमी अंतर कमी होणार असून प्रवास वेळेत आणि खर्चात लक्षणीय बचत होईल. मुळशी-ताम्हिणी पूल व बोगदा हा पहिला पर्याय तर माणगाव-कुंभे-घोळ-पानशेत मार्ग हा दुसरा प्रभावी पर्याय मानला जात आहे, जो ताम्हिणी घाटावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. दिघी बंदराला ‘लाईफलाईन’ची गरज आहे. 38 हजार कोटींच्या गुंतवणुकीत उभारले जाणारे दिघी बंदर हे उद्योग, आयात-निर्यात आणि लॉजिस्टिक्ससाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. मात्र, या बंदराच्या यशस्वीतेसाठी सक्षम रस्ते जोडणी अत्यावश्यक असून पुण्याशी थेट संपर्क झाल्यास पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते.डॉ. मोहन दोशी, सामाजिक कार्यकर्ते, माणगाव
नवीन मार्गामुळे श्रीवर्धन, महाड आणि दक्षिण कोकणातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल, तर कुंभे-पानशेत परिसर पर्यटन केंद्र म्हणून नव्याने उदयास येण्याची शक्यता आहे. सुरक्षित आणि कमी वेळेत होणारा प्रवास पर्यटकासाठी आकर्षण ठरणार असून दोन जिल्ह्यातील आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. इतिहासात ताम्हिणी घाट मार्गासाठी जसा राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनिक समन्वय निर्णायक ठरला, तसाच समन्वय आज आवश्यक आहे. केवळ 7 किमीचा दुवा पूर्ण झाला तर दिघी-पुणे शॉर्टकट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा खरा ‘गेमचेंजर’ ठरू शकतो.पंकज तांबे, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस पक्ष, रायगड