Civic Issues pudhari
रायगड

Civic Issues: म्हसळा शहराचे प्रवेशद्वारच झाले बकाल; राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या विकासाकडे दुर्लक्ष?

पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

श्रीकांत बिरवाडकर

म्हसळाः तालुक्याची मुख्य बाजारपेठ आणि शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक- दिघी नाका सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीच्या या चौकातील विकासकामांकडे संबंधित यंत्रणांनी पाठ फिरवल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

दिघी नाका हा तालुक्याचा स्वागत चौक मानला जातो. चौकाला लागून एसटी स्थानक, ग्रामीण रुग्णालय, रिक्षा व मिनिडोर स्थानक तसेच विविध व्यावसायिक आस्थापना असल्याने येथे चोवीस तास नागरिकांची वर्दळ असते.

याच परिसरात नव्याने तालुका पोलीस ठाण्याचे भव्य प्रशासकीय संकुलही उभारले जाणार आहे. मात्र अशा महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. चौकातील मुख्य हमरस्ता सध्या खड्ड्यांनी विद्रूप झाला असून गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या दुरुस्तीकडे नगर पंचायत तसेच संबंधित शासकीय विभागांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पावसाळा तोंडावर आला असताना या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी,अपघात आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गटारांवर अतिक्रमण, रस्त्यालगत उभारलेल्या झोपड्या, टाकून दिलेल्या जुन्या हातगाड्या आणि अनधिकृत व्यावसायिक अडथळ्यांमुळे चौकाची शोभा कमी झाली असून शहराच्या सौंदर्यालाच गालबोट लागले आहे. तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चौकाची अवस्था पाहून बाहेरून येणाऱ्या नागरिकांमध्येही नकारात्मक संदेश जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सध्या राजकीय घडामोडींमध्ये व्यस्त असल्याने नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका देखील केली जात आहे. दरम्यान या अतिक्रमणांमागे नेमके कोणाचे पाठबळ आहे आणि प्रशासन कारवाई का करत नाही ? याबाबत चौकात विविध चर्चांना उधाण आले आहे.

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती, अतिक्रमण हटविणे, वाहतूक व्यवस्थेची सुधारणा आणि चौकाचे सुशोभीकरण करून चौकाचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

अतिक्रमणांचा वाढता विळखा

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेली सार्वजनिक पाणपोई आजही नागरिकांच्या सेवेत आहे. मात्र या पाणपोई समोर झालेल्या कथित अतिक्रमणामुळे परिसराचा मोकळेपणा हरवत चालल्याचे चित्र आहे.परप्रांतीय व्यावसायिकांनी अतिक्रमण करून येथे व्यवसाय थाटला आहे. याबाबत नगर पंचायत कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT