तळोशी येथील नवसाला पावणारी देवी रंगुमाता Pudhari Photo
रायगड

Devi Rangumata Temple | तळोशी येथील नवसाला पावणारी देवी रंगुमाता

पुढारी वृत्तसेवा

महाड हे कोकणातील अति महत्वाचे गांव. रायगडास जाण्यास येथूनच सुरुवात होते. महाड-रायगड रस्ता सुमारे अंतर पंचवीस किलोमीटर असून रस्ताही उत्तम स्थितीत आहे.

रायगडच्या तळाशी असलेले एकमेव गांव म्हणजे तळोशी. महाड ते तळोशी यामधील मैदानी प्रदेशात शिवशाहीत शिवबंदीचा मुक्काम असायचा. गांधारीचे मुबलक पाणी आणि मैदानी सखल प्रदेश असल्यामुळे इथेच सैन्याचे तळ पडत. अनेक लढायांचे सैन्य याच तळावरुन कामगिरीवर जात असे. असा हा सुरम्य परिसर याच तळोशी गावाची प्रसिद्धी येथील रंगुमाता देवस्थानामुळे सार्‍या महाराष्ट्रभर पसरली आहे. तळोशी हे छोटेसे गांव सार्‍या जगभर याच रंगुमाता देवस्थनामुळे पोचले आहे. नवसाला हमखास पावणारी जनसामान्यांची दुःखे दूर करणारी आणि गावाला आपल्या भक्तांना अभय देणारी देवता म्हणूनही या देवीचा लौकीक आहे.

महाडपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर उत्तरेस महाड गावापासून दूरवर रायगड रोड लगत हे रंगुमाता देवस्थान आहे. नांद्रुकीची झाडे आणि कडेलाच गोडया स्वच्छ पाण्याने भरलेली विहीर असे निसर्ग सान्निध्य सुरम्य जागा ना मंदिर ना डौलारा एका झाडा खाली पाषाण रुपी तळोशी गावची रंगु मातेची देवी वसली आहे.

गुजरात-भडोच इत्यादी भागापर्यंत या देवीचे भक्तगण विखुरलेले आहेत. गावातील पार्टे मंडळी या देवीचे पुजारी म्हणून वंश परंपरेने पूजा अर्चा करतात. फार पूर्वी पार्टे मंडळींची फक्त सहाच घरे होती. आता त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. हा मान क्रमाक्रमाने चैत्र प्रतिपदेपासून सतत बदलत असतो. मानकरी देवी पुढे नवस बोलणे, दिवाबत्ती लावणे, पुजाअर्चा करणे इत्यादी कामे अतिशय आवडीने व भावपूर्ण श्रद्धेने करत असतात. फार पूर्वी देवीचा गवगवा कमी प्रमाणात होता. वर्षभर उन्हात, पावसात उघड्यावर असणारी देवी देव-देवस्कीच्या कामासाठीच वापर होत होता. पण लोकांनी लक्ष देऊन या प्रथा बंद केल्या. लोकांच्या मनात देवीला निवारा करावा असे अनेकदा आले पण देवीचीच इच्छा नसल्यामुळे ते काम तसेच राहून गेले. तरीही भक्तांनी गांवकरी मंडळींनी देवीचा सारा परिसर सुशोभित केला. भक्तलोकांसाठी बसण्याची व्यवस्था, परिसराला उत्तम प्रतीची फरशी घालून वातावरण प्रसन्न ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. देवीजवळ आपले गार्‍हाणे सांगितले तर देवी रंगुमाता भक्ताला अभय देऊन त्याची मनोकामना पूर्ण करते अशी साक्षात्कारी देवी म्हणून देवीची प्रसिद्धी आहे. फार पूर्वी देवीजवळ चांदीच्या वस्तू त्या पेटीत ठेवत. पावसाळ्यात पत्रा कुसल्यामुळे सार्‍या वस्तू विखुरल्या जात पण कोणीही व्यक्ती त्या वस्तूंना हात लावण्यास धजत नसे. आजही पाळणे घरे इत्यादी वस्तूंच्या प्रतिकृती तेथे देवीस भेट म्हणून देण्यात येतात. देवीच्या जवळील झाडांना दोर्‍या बांधून असंख्य वस्त्रे त्या दोर्‍यावर ठेवली जातात.

उन्हा-पावसात हे उंची कपडे, शाली, लुगडे उघडयावर असतात पण कोणीही व्यक्ती या वस्तूंना बोटदेखील लावत नाही. देवीचे पुजारी देवीजवळ भक्ताचे गा-हाणे मांडतात. नारळ मन्सून देवीपुढे फोडतात. देवीला प्रार्थना करतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. देवीचे भक्त सर्व स्तरात आहेत. त्यांची देवीवर अढळ श्रद्धा आहे. आपली राखण करणारी देवता म्हणून हे लोक रंगुमातेला भजत असतात. रिक्षा व्यावसायिक आपल्या रिक्षांवर रंगुमाता प्रसन्न म्हणून अभिमानाने लिहीत असतात. महाड शहरात व देवीच्या परिसरात लोकांनी आपल्या घरांना, वास्तूला रंगुमातेचे नांव दिलेले आपणास पहावयास मिळते. अशी ही आपल्या परिसरातील जागृत देवता रंगुमाता म्हणजेच तळोशीची देवी. परिसरातील आपल्या भक्तगणांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांच्या सदैव पाठीशी आहे असा विश्वास तिच्या भक्तगणांकडून व्यक्त केला जातो.

गुजरात, गोव्यातील भाविकांचे श्रद्धास्थान

सुरत, भडोच, मुंबई, पुणे, गोव्यापासून भाविक मंडळी श्रद्धेने देवीच्या दर्शनाला येत असतात. देवीच्या जवळ जाता येईल असा बारमाही रस्तादेखील बनविण्यात आलेला आहे. प्रसाद तयार करण्यासाठी पूर्वी लोकांना उन्हा-पावसात थांबावे लागे त्यासाठी लोकांनी लोकवर्गणी गोळा करुन सुंदर असे शेड उभारले आहे. देवीचा मंडप (मोकळी जागा) सदैव भक्तगणांनी गजबजली असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT