Poladpur Road Issue Pudhari
रायगड

Poladpur Road Issue: शहरातील रस्ते सुसाट मात्र ग्रामीण भागात खडखडाट

पर्यटन, दळणवळण वाढीसाठी पर्याय रस्ते निर्मिती गरजेची

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: गेली अनेक वर्षे पोलादपूर तालुक्यातील अनेक पर्याय रस्ते ची पूर्तता होत नसल्याने तालुक्यातील विकासात्मक दळणवळणाला फटका बसत आहे. दरवर्षी पावसाळी हंगामात दरड कोसल्याने आंबेनळी घाट बंद करावा लागत आहे.

या मार्गाला सुद्धा पोलादपूर तालुक्यातील गावामधून पर्याय मार्ग तयार करणे शक्य आहे, मात्र त्याकडे फारसे लक्ष न दिल्याने बंदच्या काळात लांबचा प्रवास करावा लागत आहे. केंद्र अथवा राज्य शासन मोठ्या शहरात लिंक रोडसह इतर पर्याय मार्गाचे सर्वेक्षण निहाय मार्ग तयार करत आहेत. मात्र त्याचवेळी ग्रामीण भागाकडे होणारे दूर्लक्ष खेद जनक म्हणावे लागले.

पोलादपूर महाबळेश्वर मार्ग वरील आंबेनळी घाटाला पर्यायी रस्त्याची गरज असल्याचं अनेक वेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या लक्षात आणून सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले अशी माहिती माजी लोकप्रतिनिधी यांनी अनेकवेळा व्यक्त केली.

तालुक्यातील पितळवाडी केवनाळे आंबेमाची चिरेखिंड रस्ता आंबेनळी घाटाला पर्याय रस्ता म्हणून देण्यात यावा अशी मागणी तत्कालीन आमदार व मंत्री भरत गोगावले यांच्याकडे केली होती त्यानुसार पितळवाडी केवनाळे, आंबेमाची चिरेखिंड हा पर्याय रस्ताचे काम सुरू करण्यात आले.

मात्र निधी अभावी तो पूर्णत्वास गेला नाही कच्चा स्वरूपात हा रस्ता तयार झालेला आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात निधी टाकल्यास हा रस्ता आंबेनळी घाटाला एक पर्यायी रस्ता म्हणून होऊ शकतो आज जर या रस्त्याचे काम सुरू झाले असते तर साताराकडे जाणारी वाहतूक पुणे ताम्हणे किंवा कराड मार्गे फिरवायला लागली नसती अशी माहिती नागरिकांनी दिली.

रस्त्याला अनेक पर्याय रस्ते सुचवलेले आहेत. पोलादपूर-कुडपण-कोंडोशी-कुमठे वाडा कुंभरोशी मार्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा व सातारा,रायगड जिल्ह्याला जोडणारा पर्यायी रस्ता होऊ शकतो.

रस्त्यामुळे पोलादपूरातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे कुडपण गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होईल पावसाळ्यात काश्मिरीची आठवण देणार कुडपण गाव विविध निसर्गसौंदर्याने नटलेलं धबधब्यांच्या प्रवाहात खुलणारा कुडपण गाव सर्वांना पाहता येईल व आंबेनळी घाटात रस्ता बंद झाल्याचे प्रकार घडल्यास हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वापरला जाऊ शकतो त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी रायगड व सातारा जिल्ह्याचे सा.बां.चे सर्व अधिकारी यांनी एकत्रित येऊन रस्त्याची पाहणी करून हा रस्ता प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

रस्त्याचेकाम धीम्या गतीने चालू आहे. पूर्णत्वाकडे जाण्याचा लक्षण अजूनही दिसत नाही हा रस्ता झाल्यास महाबळेश्वरकडे येणारे अनेक पर्यटक प्रतापगडकडे येतात त्याप्रमाणे जर हा मार्ग झाल्यास सुप्रसिद्ध असणारी भिमाची काठी पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील पर्यटक नक्कीच कूडपणला भेट देतील कुडपणची पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख झाल्यास फायदा स्थानिकांना होईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागेल.

सा. बां. विभागाने आराखडा तयार करावा अशी जनतेची मागणी

एक पर्यायीमार्ग म्हणून पश्चिम घाटाला जोडणारा शिवकालीन मार्ग म्हणजे आड किनेश्वर जुने राम वरदायिनी मंदिर ते पार महाबळेश्वर रस्ता हा रस्ता शिवकाळामध्ये अस्तित्वात होता. पश्चिम घाटाकडे जाणारी संपूर्ण वाहतूक या रस्त्याने होत होती. हा शिवकाळातील रस्ता आजही आपला अस्तित्व राखून आहे. साधारणत: दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता हा बाकी आहे, कारण किनेश्वर गायमुखापर्यंत आता रस्ता पोलादपूर कडून घेण्यात आलेला आहे.

महाबळेश्वरकडून पार मार्गे जुने वरदायनी मंदिरापर्यंत रस्ता पक्क्या स्वरूपात झालेला आहे. साधारण दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता झाल्यास हा रस्ता महाबळेश्वर रस्त्याला आंबेनळी घाटाला पर्याय रस्ता म्हणून उपलब्ध होऊ शकतो त्याचप्रमाणे पोलादपूर देवळे दाभिल गावातून सुद्धा वाडा कुंभ रोशीला जोडणारा रस्ता अस्तित्वात आणल्यास अत्यंत कमी घाट मार्ग व दर्डीचा धोका रस्त्याला कमी प्रमाणात होऊ शकतो हे सर्व पर्यायी रस्ते विचारात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने याचा आराखडा तयार करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT