बंदी झुगारुन देहरंगवर गर्दी वाढली आहे. छाया : राजेश डांगळे
रायगड

Raigad News : बंदी झुगारुन देहरंगवर गर्दी वाढली

पर्यटकांचा अतिउत्साह जीवावर बेततोय, पोलिसांचा कानाडोळा

पुढारी वृत्तसेवा

खारघर ः पावसाळा सुरु होताच रायगडातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची पावले पडू लागली आहेत. पण या पर्यटकांचा अतिउत्साहीपणा जीवावर बेतण्याच्या घटना घडू लागल्याने प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान,पनवेल तालुक्यातील सर्वच धरणक्षेत्रावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला नव्हता.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेश्वर, देहरंग, मोरबे ही धरणे तसेच वारदोली धबधबा, कुंडी धबधबा, हरीग्राम नदीपात्र, धोदाणी, चिंध्रण, महोदर, शांतीवन नदीपात्र, माची प्रबख व खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदई, नेवाळी धबधबा, गाढी नदीपात्र अशा ठिकाणी पावसाळी पर्यटन स्थळे आहेत. सदर ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशेष शाखा रश्मी नांदेडकर यांनी विशेष आदेशान्वये केली आहे.

सदर परिसरामध्ये पावसाळ्यात दर शनिवार व रविवार या दिवशी सुमारे 300 ते 400 व गाढेश्वर धरण परिसरात सुमारे 4000 ते 5000 तरुण-तरुणी कुटुंबांसह व मित्रांसह फिरण्यास येतात. परंतु अनेक पर्यटक हे दारु प्यायलेले असतात. ते धरणातून येणार्‍या नदी नाल्याच्या पाण्यात उतरतात. अनेकांना येथील पाण्याचा अंदाज नसल्याने पर्यटक गाफील असतात व अचानक पाण्याचा लोंढा वाढून त्यात ते पर्यटक वाहून जावून बुडून मृत्यू होतात. या अनेक घटना पनवेल तालुका पोलीस ठाणे तसेच खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असल्याने सदर ठिकाणी यावर्षी सुद्धा पावसाळी पर्यटन स्थळांचे ठिकाणी पर्यटकांना भेटी देण्याबाबत प्रतिबंधित करण्याचे आदेश त्यांनी काढले आहे. मात्र पोलिसांचे हे आदेश रविवारी पर्यटकांनी झुगारुन लावल्याचे दिसून आले.

रविवारी पावसाची उघडझाप सुरू होती.त्यामुळे पनवेल परिसरातील डोंगरातून देहरंग धरण परिसरात येणार्‍या धबधब्यांवर तसेच नदीच्या पात्रात पर्यटक मोठया प्रमाणात उतरल्याचे दिसून आले. यामध्ये लहानमुलांसह महिलांचाही समावेश होता.विशेष म्हणजे या सर्वांनी कुठल्याही प्रकारचे लाईफ जॅकेट परिधान केलेले नव्हते. अशाच प्रकारे देहरंग बॅकवॉटर परिसर तसेच शांतीवन फाटा येथील नदी पात्रात देखील पर्यटक बिनधास्तपणे आनंद लुटताना दिसत होते.

तपासणी पोलीसच बेपत्ता

देहरंग धरणावर जाण्यास पोलिसांनी बंदी घातलेली आहे.मात्र,रविवारी या परिसरात कुठेही पोलीस आढळून आलेले नाहीत.उलट ज्या चेकींग पॉईंटवर बंदोबस्त हवा होता तेथे कमालीचा सन्नाटा जाणवला.पोलिसांनी वाहने अडविण्यासाठी लावलेले बॅरिकेट्स रस्त्यावर आडवी पडल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT