Eknath Shinde Pudhari
रायगड

Eknath Shinde | गडकोटांचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड किल्ल्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाचा शुभारंभ; राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांवर राबविणार मोहीम

पुढारी वृत्तसेवा

Raigad Fort Swachhata Abhiyan

महाड : राज्यातील ऐतिहासिक गडकोट किल्ल्यांचे पावित्र्य, स्वच्छता आणि ऐतिहासिक वैभव जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. संविधान दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियाना’चा शुभारंभ रायगड किल्ल्यावर करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची उभारणी करताना केलेले सूक्ष्म नियोजन, भक्कम बांधकाम, पाण्याची व्यवस्था आणि आवश्यक सोयीसुविधांची रचना आजही थक्क करणारी आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि गडकोटांचे पावित्र्य व स्वच्छता कायम राखणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

राज्यातील अनेक ऐतिहासिक किल्ल्यांवर हजारो तरुण, दुर्गप्रेमी आणि सामाजिक संस्था स्वच्छता व संवर्धनासाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळावे, या उद्देशाने पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून हे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू झालेल्या या मोहिमेमुळे तरुणांमध्ये दुर्गसंवर्धन आणि स्वच्छतेबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

या अभियानाचा विस्तार राज्यातील विविध ऐतिहासिक गडकोटांवर करण्यात येणार आहे. रायगडसोबतच खांदेरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, राजगड, लोहगड, शिवनेरी आणि प्रतापगड यांसह अन्य ऐतिहासिक किल्ल्यांवरही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

ऐतिहासिक गडकोटांचे वैभव जपणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि हा अनमोल वारसा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित राखणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनासोबतच नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT