रसानीच्या श्रीदत्त मंदिरास पर्यटनस्थळाचा दर्जा  Pudhari
रायगड

Datta Jayanti 2024 | रसानीच्या श्रीदत्त मंदिरास पर्यटनस्थळाचा दर्जा

आजपासून रसानी टेकडीची श्री दत्त यात्रा ; कुरूळ, वाडगाव, वेश्वी, बेलकडे पंचक्रोशीत भाविकांचे श्रध्दास्थान

पुढारी वृत्तसेवा
रेवदंडा : महेंद्र खैरे

अलिबाग तालुक्यात कुरूळ, वाडगाव, वेश्वी व बेलकडे पंचक्रोशतील भाविकांचे श्रध्दा व भक्ती स्थान असलेल्या रसानी टेकडीवर श्री दत्त यात्रेस मोठी गर्दी भाविकांची होते. जिल्हयांत श्री दत्त जयंती निमित्त ठिकठिकाणी उत्सव व यात्राचे पारंपारीक आयोजन असते, यामध्ये अल्पावधील रसानी टेकडीवर श्री दत्त यात्रा प्रसिध्दीस आली आहे. नुकतेच माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी वाडगावचे माजी सरपंच जयेंद्र भगत यांचे मागणीने रसानी टेकडी परिसर श्री दत्त मंदिरास पर्यटन स्थळांचा दर्जा दिल्याने वर्षभर भाविकांसह पर्यटक सुध्दा या ठिकाणी भेटीस येतात.

अलिबाग शहराचे अगदीच नजीक असलेल्या रसानी टेकडीवरील श्री दत्त मंदिराकडे जाण्यासाठी वाडगाव,कुरूळ व वेश्वी या बाजूने जाण्यासाठी रस्ता व पायर्‍या बांधण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कुरूळ, वेश्वी, वाडगांव व बेलकडे या चार गावाचा श्री स्वामी दत्तात्रेय चैतन्यधाम दत्त मंदिर ट्रस्ट प्रतिवर्षी श्री दत्त जयंतीनिमित्त उत्सव व यात्रेचे आयोजन करते.

वाडगावचे कै.काशिनाथ मरबा भगत, वेश्वीचे गणपत चिमणाजी पाटील आदी चार प्रतिनिष्ठ नागरिकांनी रसानी टेकडीवर श्री दत्त मुर्तीची स्थापना करून श्री दत्त जयंती निमित्त उत्सव सन 1976 मध्ये सुरू केला. सन 2007 मध्ये येथील श्री दत्त मुर्तीचे नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या उत्सवाचे श्री दत्त जयंती निमित्त हळूहळू यात्रेत रूपांतर झाले. या वर्षी श्री स्वामी दत्तात्रेय चैतन्यधाम दत्त मंदिर ट्रस्ट श्री दत्त मंदिराचा 48 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. वेश्वी येथील गणपत चिमणाजी पाटील यांनी रसानी टेकडी श्री दत्त मंदिरात संस्थापक व अध्यक्ष म्हणून तिस वर्ष कार्यकाल सांभाळला, त्यानंतर कुरूळ येथील विठोबा पाटील यांनी 12 वर्षे, अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी 5 वर्षे अध्यक्षपद भुषविले. सध्या वाडगावचे कै.काशिनाथ मरबा भगत यांचे सुपूत्र ॠषीकांत भगत हे श्री स्वामी दत्तात्रेय चैतन्यधाम दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपदी असून कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. प्रसाद पाटील, सचिव सुधीर वेगुलेंकर व विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ यात्रा उत्सव कमिटी यात्रेचे नियोजन करत आहेत.

वर्षभरात या श्री दत्त मंदिरात गुरू पौर्णिमा, तसेच प्रत्येक गुरूवारी या दिवशी मोठी गर्दी असते. छोटेशी टेकडी असलेला रसानी टेकडीवर वन खात्याने वृक्ष लागवड प्रकल्प राबविले आहे. तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे वतीन वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामुळे रसानी टेकडी परिसर निसर्ग रम्य असे ठिकाण बनले आहे. या रसानी टेकडीवरून दुरवर नजर टाकल्यावर निसर्गरम्य विलोभनिय दृश्य दिसते. श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठया संख्येने भाविका व पर्यटक भेटीस येतात.

धार्मिक कार्यक्रमांमुळे अखंड अध्यात्मिक वातावरण

या वर्षी रसानी टेकडी श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता कुरूळ, वेश्वी, वाडगांव, व बेलकडे पसिरातील भाविक मंडळीचा सहभागाने श्री गुरूचरित्राचे अखंड पारायण, शनिवार 14 रोजी सकाळी 6 वाजता सुधीर वेंगुर्लेकर व आरती वेर्गुलेकर यांचे हस्ते श्रीदत्त मुर्तीस अभिषेक व महापुजा, दुपारी 12.30 ते 2.30 वाजता महाप्रसाद, दुपारी 3 ते 4 बेलकडे ज्येष्ठ ग्रामस्थ मंडळीचे पारंपरिक भजन, सायंकाळी 4.30 ते 6 श्री दत्त जयंती निमित्त नांदाईपाडा येथील रविंद्र वाघमारे यांचे कीर्तन, हार्मोनियम नरेश कडू वाडगाव व तबला सुनाद वाघमारे, सायंकाळी सात वाजता कुरूळचे शाहीर दिलीप पाटील यांचे साईनाथ कलापथकाचा पोवाडे गायन होणार आहे. यास ढोलकी साथ श्याम गुरव,अभय पाटील यांची आहे. रात्री 8 वाजता कुरूळचे हनुमान प्रासदिक मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, रात्री 9 वाजता नवयुग भजन मंडळ कुरूळचा भजनाचा कार्यक्रम तसेच 15 डिसेंबर रोजी दुपारी तिन वाजता हनुमान प्रासदिक भजन मंडळ बेलकडे बुवा अनंत म्हात्रे, मुंबई व प्रकाश नाईर्क, पखवाज गणेश पाटील, पनवेल व भुषण पाटील, सायकांळी 7 वाजता आक्षी येथील साईबाबात भजन मंडळीचे भजन, रात्री 8 वाजता नादब्रम्ह भजन मंडळ आक्षी बुवा नंदकुमार वाळंज व बाबू पाटील आक्षी, मृदंग रमेश केणी व महेेश ठाकूर, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुगम संगिताचा कार्यक्रम बी हेमंत प्रस्तुत स्वरॠुता कार्यक्रम गायक हेमंत भगत, हार्मोनियम नरेश कडू, निवेदक अंजली लेले, तबला चंद्रहास भगत व विराज म्हात्रे यांची आहे. रात्री 8.30 वाजता श्री गोकुळेश्वर प्रा. विठ्ठल रूक्मिणी भजन मंडळ, वेश्वी बुवा, निलेश जंगम-मुळे, मृदुंग महेश ठाकूर, संस्थापक कै.दामोदर मगर, 17 डिसेंबर रोजी सायकांळी 7 वाजता स्वरपंचम थळ प्रस्तुत सुगम संगिताचा कार्यक्रम होईल. गायक संजय रावळे व कलाताई पाटील, मृदंग परेश पाटील, रात्री 8 वाजता दत्त प्रासंगिक भजन मंडळ वाडगाव बुवा रमेश भगत, मृदुंग विजय पाटील-वायशेत, कमळाकर भगत यांची सात असणार आहे. 18 डिसेंबर दुपारी 2 वाजता महिला कबड्डी स्पर्धा, आयोजक वाडगाव ग्रामस्थ, सायंकाळी 7 वाजता जय हनुमान प्रासदिक भजन मंडळ वाडगाव, बुवा नरेश कडू, मृदुंग विराज म्हात्रे यांची असणार आहे.

रसानी टेकडीवर वर्षभरात येत असलेल्या भाविक व पर्यटक यांचा ओघ पाहून जिल्हयांचे माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचेकडे हा परिसर पर्यटनक्षेत्र म्हणून विकसीत करण्याची मागणी वाडगाव ग्रामस्थांन केली होती. त्यानुसार माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रसानी टेकडी व दत्त मंदिर परिसरास पर्यटन क्षेत्राचा दर्जा बहाल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT