रायगड ः पुनर्वसू आणि पुश्य नक्षत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे रायगडातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा निर्माण झाला आहे. 28 पैकी 23 धरणे पूर्ण भरलेली आहेत, तर काही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अजूनही मोसमी पावसाचा कालावधी दोन अडीच महिने असल्याने ही धरणे पूर्ण क्षमतेने भरतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता गरज आहे, ती पाण्याच्या नियोजनाची. शेतीलाही पूरक असा पाणी साठा निर्माण झाला आहे.
रायगड जिल्हयात या वर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. गेली दोन - अडीच महिने काही दिवस वगळता पावसाचा जोर राहिला आहे. त्यामुळे जिलह्यातील धरण, तलाव, विहिरी, पाझर तलाव आणि नद्यांना मुबलक पाणी साठा उपलब्ध झाला आहे. चांगल्या पावसामुळे यावर्षी मे महिन्यातच जिल्ह्यातील शेकडो गावे टँकरमुक्त झाली.
सध्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगल्या प्रकारे आहे. जून महिन्यात जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अलिबाग, पनवेल, खालापूर, सुधागड, पेण, रोहा, म्हसळा, उरण येथे पावसाचे प्रमाण सर्वाधित राहिले. सध्या जुलै महिना सुरु असून पावसाचा जोर कमी जास्त असला तरी पावसाने जुलै महिन्यातील 80 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे याही महिन्याची सरासरी पाऊस गाठण्याची शक्यता आहे.
जिल्हयात गेल्या अडीच महिन्यात झालेल्या पावसाने धरण, तलाव, नदी, विहिरींचा पाणीसाठा मुबलक प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी एक मोठा प्रकल्प, मध्यम तीन आणि लघु प्रकल्प 44 आहेत. तर पाझर तलाव, कोल्पापूर बंधारा, साठवण वंधारे असे एकूण 158 प्रकल्प आहेत. यामधून समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यातील जिल्ह्यात रायगड पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणार्या 28 धरणांपैकी 23 धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर दोन धरणे 76 ते 99 टक्के, दोन धरणे 51 ते 75 टक्के आणि एक धरण 50 टक्क्याच्या आत भरले आहे.
अजूनही मोसमी पावसाचा कालावधी दोन अडीच महिने असल्याने ही धरणे पूर्ण क्षमतेने भरतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात सप्टेंबरअखेर पर्यंत मोठ्याप्रमाणात पाऊस होत असतो. त्यामुळे पाणीसाठ्यांची पातळी कायम राहण्यास मदत होते. असे असले तरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई सुरु होते. गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे आता खरी गरज आहे, ती पाण्याच्या नियोजनाची. प्रशासनाने शाश्वत पाणी साठ्यांसाठी उपाययोजन करण्याची गरज आहे. सध्या शेतीलाही पूरक असा पाणी साठा निर्माण झाला आहे.
रोहा तालुक्यातील सुतारवाडी, म्हसळा तालुक्यातील पाभरे, संदेरी, महाड तालुक्यातील खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव, उन्हेरे, कवेळे, घोटवडे, ढोकशेत, खालापूर तालुक्यातील भिलवले, कलोते-मोकाशी, डोणवत, तळा तालुक्यातील वावा, मुरुड तालुक्यातील फणसाड, पेण तालुक्यातील आंबेघऱ, पनवेल तालुक्यातील उसरण, मोरबे, बामणोली, श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी आणि कर्जत तालुक्यातील अवसरे ही 23 धरणे 100 टक्के भरली आहेत.