Kharepat flooding -Damage to 300 fish ponds
खारेपाटातील 300 मत्स्य तलावांचे उधाणामुळे नुकसान pudhari photo
रायगड

Kharepat flooding | खारेपाटातील 300 मत्स्य तलावांचे उधाणामुळे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

रायगड : 8 ते 11 जुलै 2024 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, उधाण भरती आणि आंबा नदीच्या पूराचे पाणी अलिबाग तालुक्यांतील खारेपाट क्षेत्रातील धाकटे शहापूर सुमारे 3000 एकर क्षेत्रामध्ये शिरून सर्वच भातशेती व तलाव पाण्याखाली गेले होते. हे सर्वच क्षेत्र पूर पातळी व भरती पातळीच्या 2 मिटर खाली असल्याने त्यात पाणी शिरते ,थांबून राहते व ओहटीच्या वेळीच हे पाणी उघाडी द्वारे बाहेर जाते. पाणी येताना तिन्ही बाजूने ते येते पण जाण्याचा मार्ग उघाडी हा एकच आहे. परिणामी येथील 300 तलावधारकांचे 3 कोटी रुपयांच्या घरात नुकसान झाले असल्याचा दावा मत्स्य तलावधारक शेतकरी सुनील बाळाराम पाटील यांनी केला आहे. मात्र सरकारी यंत्रणा नुकसानी पंचनाम्यांकरिता पोहोच रस्तेच नसल्याने पोहोचूच शकलेली नसल्याने नुकसान भरपाई मिळणे दुरापास्त झाले आहे. शासकीय यंत्रणेने नुकसान भरपाई देण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

बाधीत मत्स्य तलावधारक शेतकरी सुनील बाळाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तलावांतील जुने वाढलेले रोहू,कटला,गावठी पापलेट, सायप्रिंस, गवत्या हे मासे वाहून गेल्याने झालेले नुकासान 60 हजार रुपये आहे.नवीन बीज व बोतुकलीच्या 10हंड्या वाहून गेल्याने 5 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 4 हजार 500 रुपये किमतीचे मत्स्य खाद्य, 12 हजार 500 रुपये किमतीचे जिताडा बीज, पूर्ण वाढलेले 100 नग जिताडा मासे 50 हजार रुपये असे सुमारे 1 लाख 32 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त एकूण 300 तलांवात पाणी घूसून ते पूढे वाहात गेल्याने प्रत्येकी किमान 1 लाख या प्रमाणे एकूण 3 कोटी रुपयांचे तलावांचे नुकसान झाले आहे.

अलिबाग तालुक्यांतील खारेपाट क्षेत्रातील शहापूर व धेरंड या गावांमध्ये 200 च्यावर जिताडा माशांचे तलाव आहेत. तलावासाठी कच्ची घरे करून शेतकरी येथे रहात असतात. माशांना खाद्य आणावे लागते. बाजारात मासे विकण्यासाठी कच्च्या चिखलयुक्त बांधावरूनच जावे लागते. पूरपरिस्थितीत या तलावधारकांना सरकारी यंत्रणा मदत करू शकत नाही, कारण येथे पोहोच रस्ते नाहीत. या बाबत सन 2019 मध्ये रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी व उप जिल्हाधिकारी (रोहयो)आर.बी.मठपती यांनी शहापूर येथे पोहोच रस्ता होणे कामी पुढाकार घेतला होता. त्यांनी तलावांना भेटी देखील दिल्या होत्या. पण अंदाजपत्रक न बनवल्यामुळे पोहोच रस्ता होऊ शकला नाही.काही ठिकाणी अजून देखील होडीचा वापर करावा लागतो.

प्रत्येक तलावधारकाचे नुकसान

याच परिसरात सुमारे 300 हून जास्त मत्स्य तलाव आहेत. त्याच बरोबर उत्कर्ष मत्स्य शेती गटाचे सुमारे 15 मत्स्य तलाव आहेत. हे सारे तलाव समुद्र भरती रेषेच्या 2 मीटर खाली आहेत. तलावाचे बांध उंच करण्याची तरतूद रोजगार हमी योजनेत नाही. मत्स्य तलावांना जोडणारे पोहोच रस्ते अस्तित्वात नाहीत. तलावात पाणी शिरून बांधावरून वाहून गेल्याने तर काही ठिकाणी तलावच पाण्यात बुडाल्याने अगोदरचे मासे तसेच नवीन बीज वाहून गेले. त्यामुळे प्रत्येक तलावधारकाचे सुमारे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले.

2019 -20 मध्ये अशीच नुकसान

शहापूर -धेरंड येथील शेतकरी देशाच्या सकल उत्पन्नात भर घालत आहे. असे शेतकरी जेव्हा आर्थिक अडचणीत येतात तेव्हा मदत व पुनर्वसन विभागाचे पहिले दार म्हणजे तहसीलदार असल्याने आपण जबाबदारी घ्यावी व या कामी आमची काय मदत लागेल ते देखील कळवावे. 2019 -20 मध्ये अशीच नुकसानी झाली होती. तेव्हा 181 मत्स्य तलाव धारकांनी नुकसानी अर्ज केले होते. त्या नुकसान भरपाईचे काय झाले ते अजून समजले नाही, असे अलिबागचे तहसिलदार विक्रांत पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात राजन भगत यांनी म्हटले आहे. दरम्यान नुकसान भरपाई पंचनाम्यांकरिता निर्देष देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलावा पर्यंत जाण्यासाठी पोहोच रस्तेच नाहीत तसेच बर्‍याच शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर मत्स्य तलावांची नोंद नाही. सर्व तलाव गावाच्या बाहेर असल्याने तेथे नेटवर्क नसते परिणामी ई -पिक पहाणी सॉफ्टवेअर चालत नाही. महसूल खात्याने तलाठी ऐवजी वेगळ्या यंत्रणेद्वारे मत्स्य तलावांच्या नोंदी घेतल्या पाहिजे. या नुकसानीचे पंचनामे कृषी,महसूल , मत्स्य खाते यापैकी कोणी करायचे यावर निर्णय होऊन तसे निर्देश दिले पाहिजेत.
- राजन भगत, खारेपाट अभ्यासक शेतकरी
SCROLL FOR NEXT