Concretization work gains momentum on the subsided road in Kashedi Ghat; indications suggest completion before the monsoon!
पोलादपूर : धनराज गोपाळ
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या मार्गावर सन 2005 च्या अतिवृष्टीमध्ये 105 फूट लांब रस्ता खचलेला होता. या रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून सातत्याने रस्ता खचण्याचे ग्रहण सुटता सुटेना, मात्र यावर्षी या रस्त्यावर कॉंक्रिटीकरण करून टेक्नॉलॉजीचा वापर करत रस्ता दुरुस्ती होणार असल्याने गेल्या वीस वर्षाचे ग्रहण सुटणार अशी भावना व्यक्त केली जात आहे.
या कामाला महामार्ग प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेमार्फत युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावर सदर काम जय भारत कंपनी मुंबई यांच्या मार्फत सुरू असून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाला गती मिळाली असली तरी मात्र यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक महिन्यासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. आता पुन्हा रस्ता बंद करण्यात आल्याने या विभागातील अठरा गावगाड्यामधील नागरिकांना जाण्यायेण्यासाठी गैरसोय होत असल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
सद्यस्थितीत या मार्गावरून एसटी बसेस सेवा पूर्णता बंद करण्यात आल्यामुळे या विभागातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सदरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे पावसाळा तोंडावर आला असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल की नाही अशी शंका या विभागातील लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक विचारत आहेत.
या रस्त्यावर डोंगर भागाकडून आधुनिक पद्धतीने ड्रिल मारून आणि स्टीलचा वापर करत काम उत्तम दर्जाचे व्हावे असा प्रयत्न दिसून येत असला तरी रस्त्याचे काम पुन्हा जैसे थे होऊ नये यासाठी जय भारत कंपनीच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मात्र पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन सदरचे काम युद्ध पातळीवर हाती घेऊन लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे यासाठी संबंधित कंपनी प्रशासन व महामार्ग प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
कातळाच्या बाजूने डोंगर भागात ड्रिल मशीनचा वापर करत रस्ता पुन्हा खचू नये यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी पावसाचे डोंगर भागात मुरणारे पाणी योग्य पद्धतीने नियोजन करून गटार काढण्यात येणार असून त्यामुळे दरवर्षी रस्ता खचण्याच्या या वारंवार होणाऱ्या घटना टळणार असल्याचे सांगितले जात आहे.
सन 2005 पासून आजतागायत या ठिकाणी रस्ता खचण्याचे सातत्य आणि दरडी कोसळण्याचे धोका कायम राहिला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहन चालक स्थानिक नागरिक यांच्यातून नेहमीच नाराजीचा सूर उमटत होता. या ठिकाणी दरवर्षी लाखो रुपये खर्च करत दागडूजी केली जात होती.
या रस्त्यावर सन 2005 पासून आजतागायत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला, मात्र रस्ता खचण्याचे ग्रहण कायम राहिले होते. मात्र सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीने केली असता सदरचे काम उत्तम दर्जाचे असले तरी हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे क्रमप्राप्त बनले आहे.
सदरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले नाही तर या विभागातील अठरा गाव वाड्यांचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनी आणि महामार्ग प्रशासन यांनी या कामाला अधिक गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करावे अशी या विभागातील नागरिकांची जोरदार मागणी होत आहे.