मुरुड जंजिरा (रायगड) : सुधीर नाझरे
एकीकडे कोकणात शेतीचा कल कमी होत असतानाच रायगडमध्ये मुरुड तालुक्यात खारआंबोली गावात २५० गावकऱ्यांनी देवळासमोरील शेतीत भात लावणी पारंपरिक गीते गात भात पेरणी केली होती. आज वालेय भाताची सामुदायिक भात बांधणी करून शेतात रचून ठेवले अशी माहिती माजी सरपंच मनोज कामाने यांनी दिली.
गावागावातील मतभेद विसरून गावच्या शेतात हाक दिल्याबरोबर पुरुष सकाळी ७ वाजल्यापासून कामाला येतात. बांधणी काम लवकर व्हावे म्हणून पारंपरिक पद्धत आजही वापरतात कोणत्याही मशीनचा वापर करत नाही.
गावातील मंडळी कुशल कामगार असल्याने बाहेर दिवसाला १ हजार मजुरी घेणारे देखील गावच्या झोडणीच्या कामाला स्वतःहून हजर राहतात. याचा उद्धेश असतो मतभेद विसरून आनंदात माणुसकीची मूल्य जपण्याचा असतो. यंदा पावसाने खुप नुकसान केले तरीही वाचलेले भात सुकवण्याचे काम प्रामणिकपणे करून आज भात बांधणी करत आहेत. खारआंबोली गावची शेती सर्वांत शेवट लावतात.
अनेक ठिकाणी अती पावसाने गावकऱ्यांचे राब वाहवून जातात. त्यामुळे गावची शेती लावून झाल्यावर उरलेले राब गावकऱ्यांना देण्यात येते, असा सार्वजनिक हिताचा विचार हा गाव जपतो. यागावची लावणी पाहण्यासाठी छायाचित्रकार व पर्यटक देखील आवर्जून भेट देतात.
शेतीची कामे जोरदारपणे सुरू
मजुरीने माणसे घेऊन शेतीची कामे राजरोसपणे सुरू आहेत. पावसाचा अनियमितपणा असला तरीही आता पावसामुळे शेत जमिनी ओसाड होऊ देत नाही. पावसाची अजूनही गरज असून त्यावरच भात शेतीची मदार आहे. मुरुड तालुक्यात ३ हजार हेक्टर जमिनीवर भात शेती केली जाते. भातपीक हे मुख्य पीक आहे.