तळा : तळा तालुक्यात सध्या खरीप हंगामात भात शेती व नाचणी शेतीला चांगले दिवस येत आहेत. रोवळा गावात खरीप हंगामात संतोषी माता बचत गटाने भातशेती व नाचणीची शेती केली आहे. रब्बी हंगामात वालाची सामुहीक शेती करून चांगले उत्पन्न मिळविले आहे. आता सामुहीक शेती करण्याकडे कल वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे.
रोवळा येथील संतोषी माता शेती उत्पादक बचत गट यांनी सन 2024 - 2025 मध्ये उत्कृष्ट शेती उत्पादन घेऊन महिला सशक्तीकरणाचा एक उत्तम आदर्श घालून दिला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून यंदा नाचणी व विविध कडधान्य पिकांची लागवड करून विक्रीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. नाचणी लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळाले असून रब्बी हंगामात महिला गटाने यावर्षी 500 किलो नाचणीचे उत्पादन घेतले. ही नाचणी प्रतिकिलो 90 रुपये या दराने विक्री करून एकूण 45000 इतके उत्पन्न गटाला मिळाले.
कडधान्य पिकांतून मोठा लाभरब्बी हंगामात गटाने विविध कडधान्य पिकांची लागवड केली होती. यामध्ये वाल, मूग, पांढरी चवळी आणि लाल चवळी यांचा समावेश होता. या यशस्वी उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकता आले आहे. गावातील इतर महिला गटांसाठीही हा एक प्रेरणादायक अनुभव ठरला आहे. या बचत गटाला साह्यक कृषी अधिकारी गोविंद पाश्चिमे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.
यावर्षी चालू हंगामामध्ये भात व नाचणी ही दोन्ही पिके गटामार्फत घेत आहेत कृषी विभागामार्फत त्यांना नाचणीचे बियाणे देण्यात आले आहे व तेथे भात पीक शेती शाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे शेतीशाळा घेऊन नवनवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.