रायगड रोपवे रेस्क्यू ऑपरेशनअंतर्गत मॉक एक्सरसाइजचे आयोजन करण्यात आले होते. Pudhari Photo
रायगड

रायगड किल्ल्यावरील रोपवेमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका

पुढारी वृत्तसेवा
इलियास ढोकले

नाते: छत्रपती शिवरायांच्या राजधानीचे ठिकाण असणाऱ्या किल्ले रायगड परिसरातील रोपवे मध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप खाली उतरविण्यात आले. रोपवे प्रशासनाने नव्याने आपल्या यंत्रणेमध्ये दाखल केलेल्या अत्याधुनिक सुरक्षात्मक यंत्रणेच्या माध्यमातून व एनडीआरएफच्या पथकाने आज (दि. १९) केलेल्या थरारक कामगिरीने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद विभागांतर्गत रायगड रोपवे रेस्क्यू ऑपरेशनअंतर्गत मॉक एक्सरसाइजचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये शासनाच्या भारतीय वायुदल, भारतीय वायुदल विशेष आर्मी, इंडियन कोस्टकार्ड मुरुड, एसडीआरएफ धुळे व नागपूर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा पोलीस अधीक्षक, नागरी संरक्षण दल उरण, उपविभागीय अधिकारी महाड, तहसीलदार महाड, रायगड रोप वे प्रशासन, आरोग्य विभाग, अग्निशमन दल महाड, साळुंखे रेस्क्यू टीम महाड, सिस्केप रेस्क्यू टीम महाड, आपदा मित्र महाड यांचे अधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले की, आपत्ती विभागातील अत्याधुनिक यंत्रणेमार्फत रोपवेमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितरित्या खाली काढण्यात यश आले. रोपवे सुरू असताना काही तांत्रिक अडचणींमुळे नादुरुस्ती निर्माण झाल्यास रोपवेमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी एनडीआरएफच्या प्रशिक्षित असलेल्या विशेष जवानांकडून नागरिकांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात येऊ शकते. तसेच आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास एनडीआरएफचे पथक तत्काळ उपलब्ध होऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश प्राप्त करेल, असा विश्वास शितोळे यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाच्या पायथ्याच्या रोपवे स्टेशन येथे सुमारे चार तास झालेल्या या मॉक एक्सरसाइजने पाचाड व हिरकणीवाडी परिसरातील शेकडो नागरिक रोमांचित झाले. त्यांनी चोख सुरक्षिततेची व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले. आज सकाळपासून बंद केलेली रोपवे यंत्रणा दुपारी तीन नंतर पूर्ववत सुरू करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT