उरण : 25 सप्टेंबर 1930 या दिवशी चिरनेरच्या अक्कादेवी माळरानावर ब्रिटिश सरकारच्या जुलमी जंगल कायद्याविरोधात एक क्रांतीची ठिणगी पडली. स्थानिकांनी आपल्या हक्कांसाठी जंगल सत्याग्रह पुकारला. ब्रिटिशांनी या शांततामय आंदोलनाला गोळीबाराने उत्तर दिले आणि यात आठ हुतात्म्यांसह 13 जणांनी आपले प्राण गमावले. ही घटना ’चिरनेरचा जंगल सत्याग्रह’ म्हणून संपूर्ण भारतात गाजली.
या गौरवशाली इतिहासाची आठवण म्हणून दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेरमध्ये हा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 95 वा स्मृतिदिन असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम चिरनेर ग्रामपंचायत, रायगड जिल्हा परिषद आणि उरण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
आदिवासी समाजाकडून हुतात्म्यांना मानवंदना
सत्याग्रहात हुतात्मा झालेले नाग्या महादु कातकरी यांच्या बलिदानाची आठवण म्हणून, वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने अक्कादेवी पाड्यावर विशेष स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आदिवासी कातकरी समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून ते आपल्या हुतात्म्यांना मानवंदना देतील. चिरनेरचा हा जंगल सत्याग्रह केवळ इतिहासातील एक घटना नाही, तर तो आपल्या हक्कांसाठी लढलेल्या आणि प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांच्या शौर्याचे प्रतीक आहे.