रायगड

इर्शालवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या 31 मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री शिंदेंनी स्विकारले

रणजित गायकवाड

अलिबाग, पुढारी वृत्तसेवा : इर्शाळगडाच्या (ता. खालापूर, जि. रायगड) पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 24 वर पोहचला आहे. तर अनेकजण अजून गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुर्घटनेतून बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

विधान परिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज (दि. 22) नढळ येथे दुर्घटनेतील पीडितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वतीने त्यांनी पालकत्व स्विकारल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी आमदार मनीषा कायंदे, आमदार महेंद्र थोरवे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहीरराव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

या मुलांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे यांनी मुलांना शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले. काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याकरिता स्वतःचा नंबर अनाथ मुलांना दिला. तसेच गावातील स्थानिक व्यक्ती ज्याला आपण सर्व ओळखता त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी मुलांना केली. दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीमध्ये एकूण 1 ते 18 वयापर्यंतचे 31 मुल-मुले असून त्यापैकी 21 जण आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने या इर्शाळवाडी दुर्घटनेतील या अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारले आहे. ही मुले 18 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत त्यांच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी संस्थेने घेतली असून त्यांच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करण्यात येणार आहे. खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी मुलांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत मदत कार्य सुरू राहील, असा विश्वास दिला.

SCROLL FOR NEXT