पावसाच्या पाण्याने तळे भरले Pudhari Photo
रायगड

Chavdar Tale | ऐतिहासिक तळ्याचे पाणी ‘चवदार’ होणार कधी?

शासनाकडून 72 कोटींचा निधी मंजूर, पण कार्यवाही नाही

पुढारी वृत्तसेवा
महाड ः श्रीकृष्ण बाळ

महाडमधील ऐतिहासिक चवदार तळे यावर्षी जुलै महिन्यातच काठोकाठ भरले आहे. त्यामुळे चवदार तळ्याचे सौंदर्य आणखीन फुलून गेले आहे. इतिहासाचे धगधगते कुंड आणि जगाला समतेचा संदेश देणार्‍या या तळ्याच्या जलशुद्धीकरणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या शुद्धीकरणासाठी आतापर्यत केलेल्या अनेक प्रयोगावर करोडो रुपये खर्च झाले आहेत. अमृतसरच्या सुवर्णमंदिराच्या धर्तीवर या चवदार तळ्याचे शुद्धीकरण करण्याची घोषणा शासनाकडून केली गेली आहे. त्यासाठी 72 को’टींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्या घोषणेचा लवकरात लवकर अंमल व्हावा अशी मागणी महाडकरांकडून होत आहे.

जुलै 2021 च्या महापूरात हेच चवदार तळे ओव्हर फ्लो होऊन या ठिकाणी 4 ते 5 फूट पाणी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माती, कचरा गाळ जाऊन तळ्याचे पाणी गढूळ झाले होते. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरवलेल्या यंत्रणेमुळे महाड नगर परिषदेकडून तळ्यातील गाळ काढून डागडुजी करण्यात आली होती. या वेळी तळ्यातील 11 विहिरींचा ठेवा पुन्हा दिसू लागला. या ऐतिहासिक वास्तूचे अंतरंग पाहण्याची उत्सुकता असलेल्या अनेकांसाठी हा सुखद धक्काच होता.

या विहिरी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. त्याचबरोबर या ऐतिहासिक वास्तूचे महात्म्यही पुन्हा जोरकसपणे चर्चेत आले होते. महापुरानंतर चवदार तळ्यातील गाळ सफाई व स्वच्छतेनंतर 2022 मध्ये 20 मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनी व 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार्‍या आंबेडकर अनुयायांसाठी कोथुर्डे धरणातील पाणी तळ्यात सोडून त्याचे फिल्टरेशन करून शुद्ध पाणी जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.

चवदार तळ्यामध्ये 14 विहिरी आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांनी त्या पाहिल्या होत्या. फार पूर्वी तळ्याचा वापर संपूर्ण महाड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येत होता. चवदार तळे हे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्रोत हे होते. यामुळे हे पाणी उन्हाळ्यात आटून जात असे. अशा वेळी तळ्यामध्ये डवरे (खड्डे) खोदून पाणी काढण्यात येत होते. अशा प्रकारचे 14 डवरे तळ्यात तयार झालेले आहेत. त्यांना 14 विहिरी म्हटले जाते; परंतु त्यांची खोली सात-आठ फुटांपेक्षा अधिक नाही. शहरासाठी नळपाणी योजना सुरू झाल्यानंतर तळ्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी कमी झाला. तेव्हापासून तळ्याचे पाणी कधीही आटत नव्हते. त्यामुळे ते नक्की किती खोल आहे, त्याच्या अंतरंगात काय दडले आहे, याची उत्सुकता येथील नागरिकांना होती.

महाड पालिकेकडून तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. सभागृह व बाग तयार आल्या. तळ्यात उंच कारंजी होती. ती आता बंद आहेत. मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दहा फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. सुशोभिकरण, रस्ता व इतर कामांमध्ये तळ्यातील तीन विहिरी मातीत गाडल्या गेल्या. त्यामुळे तळ्यामध्ये सद्यस्थितीत केवळ 11 विहिरीच आहेत. चवदार तळ्याच्या कोसळलेल्या भिंतीमुळे गेल्या काही वर्षांत अनेकदा राजकीय आंदोलनेही झाली आहेत.

अडीच एकरात तळ्याचा विस्तार

सध्याचे तळे अडीच एकरमध्ये असून 136 मीटर लांब आणि 97 मीटर रुंद; तर साडेपाच मीटर खोल आहे. अनेक वर्षांपूर्वी काठावर सुमारे 30 ते 35 घाट बांधलेले होते. पिण्याचे पाणी भरण्यासाठी हे घाट वापरण्यात येत होते. पालिकेकडूनदेखील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे घाट व कपडे धुण्यासाठी शेड बांधण्यात आल्या होत्या.

निधीची फक्त घोषणा

चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण व परिसर सौदर्यीकरणासाठी 72 कोटी मंजूर करणार असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती , मात्र अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शासन कर्त्यांनी प्राधान्याने चवदार तळ्याचे शुद्धीकरण व सौदर्यीकरण करावे अशी मागणी होत आहे.

तळ्यात 11 विहिरींचे अस्तित्व शिल्लक

महाडचा विकास होऊ लागला आणि चवदार तळ्याचा काही भाग बुजवण्यास सुरुवात झाली. तळ्याच्या सुशोभिकरणाच्या दरम्यान हे घाट व काही विहिरी बुजवल्या गेल्या. सद्यस्थितीत चवदार तळ्यामध्ये केवळ तीनच घाट उरलेले आहेत. पूरपरिस्थितीनंतर त्याचे पाणी उपसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 11 विहिरींचे दर्शन झाले. समाजमाध्यमांवर ही छायाचित्रे प्रसारित झाली. त्यामुळे या तळ्याचा लौकिक पुन्हा जगात पोहचला. अनेक पालक मुलांना हा ठेवा दाखवण्यासाठी येथे आणू लागले. ते या तळ्याचे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वही मुलांना पटवून देत होते. यापूर्वी तळे तीन वेळा पूर्ण उपसण्यात आले होते; परंतु 2021 साली तब्बल 14 वर्षांनी आतील भाग नवीन पिढीला पाहता आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT