कोकणातील भातशेती  
रायगड

Konkan Rice Farming Crisis-बदलत्या ऋतूचक्राची कु-हाड; कोकणातील भातशेती संकटात

Konkan Rice Farming Crisis-बदलत्या ऋतूचक्राची कु-हाड; कोकणातील भातशेती संकटात

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप

जून महिन्यात पाऊस उशिरा येतो, जुलैमध्ये धुवांधार हजेरी लावून पेरण्या वाहून जातात, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार झालेले पीक अवकाळी पावसाच्या तडाख्याने जमिनीदोस्त करतो, असे गेल्या दहा वर्षात घडत असून पावसाचे नैसर्गिक वेळापत्रकच बदलून गेल्याने या बदलत्या ऋतूचक्राची कुन्हाड कोकणातील भातशेतीवर कोसळत आहे. कोकणातील शेतकरी सध्या या बदललेल्या पावसाच्या वेळापत्रकामुळे होरपळून निघत आहेत. गेल्या पाच वर्षांत कोकणच्या हवामानात झालेल्या अनपेक्षित बदलांचा थेट फटका येथील पारंपरिक भातशेतीला बसला असून बळीराजा हवालदिल झाला आहे.

पावसाच्या वेळापत्रकातील अनिश्चितता

हवामान खात्याच्या नोंदीनुसार कोकणात मान्सूनचा एकूण पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडत असला, तरी त्याचे वितरण अत्यंत अनियंत्रित झाले आहे. पावसाचे एकूण दिवस पूर्वीच्या १०० ते ११० दिवसांवरून घटून आता केवळ ६५ ते ७५ दिवसांवर आले आहेत. कमी दिवसांत मुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे. जुलैमध्ये धुवांधार पाऊस पडल्यानंतर ऑगस्ट महिन्यात भात पिकाला पाण्याची गरज असताना १० ते १५ दिवसांचा प्रदीर्घ कोरडा खंड पडत असल्याचे चित्र सातत्याने दिसत आहे.

उत्पादनात मोठी घट आणि पेरण्यांचा बिघडलेला ताळमेळ

गेल्या पाच वर्षांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पिकांवरील रोगांमुळे भात उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्क्यांची मोठी घट झाली आहे. जून महिन्यात मान्सून लांबल्यामुळे आवण म्हणजेच रोपवाटिका तयार होण्यास उशीर होतो. परिणामी, भात लावणीची कामे जुलै अखेरपर्यंत लांबतात आणि पिकाचे संपूर्ण गणितच बिघडते.

ऑक्टोबरमधील अवकाळीचा फटका

भात पीक कापणीला आले की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस थैमान घालतो. गेल्या पाच वर्षांत या काळात सरासरी १५० ते २५० मिमी अवकाळी पाऊस नोंदवला गेल्याने उभे पीक पाण्यात कुजण्याचे प्रमाण ३५ टक्क्यांनी वाढले आहे. आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि वाढलेला खर्च

तापमानातील सततचे चढ-उतार आणि हवेतील आर्द्रतेमुळे भातावर 'करपा', 'लष्करी आळी' आणि 'तुडतुडे' या रोगांचा प्रादुर्भाव २५ टक्क्यांनी वाढला आहे. दुबार पेरणी, कीटकनाशकांची फवारणी आणि मजुरीचा वाढलेला दर यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १२,००० ते १५,००० रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असून एकंदरीत शेतीचा खर्च ५० टक्क्यांनी वाढला आहे.

पूर्वी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होत असे, मात्र आता तो जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात येतो. पावसाचे स्वरूप पूर्वी संततधार आणि नियमित असायचे, आता ते अनियंत्रित मुसळधार किंवा मोठा खंड पडणारे झाले आहे. कापणीचा काळ पूर्वी ऑक्टोबरच्या कोरड्या हवामानात पार पडायचा, आता तो नोव्हेंबरपर्यंत लांबून त्यावर अवकाळी पावसाची टांगती तलवार राहते.

वातावरण बदल ही एका रात्रीत घडलेली घटना नसून वर्षानुवर्षे चाललेली प्रक्रिया आहे. तिचे गंभीर परिणाम आता प्रखरतेने दिसू लागले आहेत. औद्योगीकरण, युद्धे, जंगलतोड आणि वणवे यांमुळे वातावरणातील वायूंचा समतोल बिघडला आहे. कार्बन डाय-ऑक्साईड वाढल्याने जमिनीलगतचे तापमान वाढून मान्सूनची चक्रे विस्कळित झाली आहेत. त्यामुळे नियमित पावसाऐवजी दीर्घ खंड पडणे किंवा अतिवृष्टी होणे असे प्रकार वाढले आहेत. डोंगरउतारांवरील बांधकामे, जलस्रोतांचे अतिक्रमण आणि मातीची धूप यांमुळे या समस्येची तीव्रता अधिक वाढली आहे. परिणामी, पेरणीपासून काढणीपर्यंतचे शेतीचे पारंपरिक वेळापत्रक पार विस्कळित झाले आहे. बळीराजाचा आर्थिक कणा पार मोडून पडला आहे.

- प्रा. डॉ. समीर बुटाला, भूगोल व पर्यावरण तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT