Ethanol Blended Petrol | इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी होते; केंद्र सरकारची कबुली 
रायगड

Ethanol Blended Petrol | इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी होते; केंद्र सरकारची कबुली

घाबरण्याचे कारण नाही : पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पर्यावरणपूरक इंधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून ई-२० (२० टक्के इथेनॉलमिश्रित) पेट्रोलचा वापर वाढवला जात आहे. मात्र, या इंधनामुळे वाहनांच्या मायलेजवर किंचित परिणाम होऊ शकतो, अशी कबुली केंद्र सरकारने पहिल्यांदाच दिली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, मायलेजमधील ही घट किंचित असेल आणि ती केवळ इथेनॉलमुळेच नाही, तर इतर अनेक घटकांवरही अवलंबून असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुरी यांनी मायलेजबाबत सांगितले की, इथेनॉलचा वापर रेसिंग कार्समध्येही केला जात आहे. यामुळे वाहनांचे पिकअप सुधारते आणि इंजिनमधील ‘नॉकिंग’ची समस्याही कमी होते. त्यामुळे मायलेजमध्ये जर थोडी घट झाली, तर त्याला कारमधील काही तांत्रिक गोष्टी, ड्रायव्हिंगची पद्धत, असे इतर अनेक घटक कारणीभूत असू शकतात.

वाहनांचे नुकसान हा समज चुकीचा

ई-२० पेट्रोल वापरल्यास वाहनांचा विमा रद्द होईल किंवा विमा कंपन्या क्लेम देणार नाहीत, अशा अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. यावर पुरी म्हणाले, विमा कंपन्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, वाहनधारकांना विम्याचा पूर्ण लाभ मिळेल. तसेच, इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होते, हा समज पूर्णपणे चुकीचा आणि तथ्यांवर आधारित नसल्याचे सांगत सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे.

इंजिनची क्षमता सुधारते : ई-२० पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते; परंतु यामुळे गाडीचा पिकअप आणि इंजिनची क्षमता अधिक सुधारते.

विम्याची पूर्ण सुरक्षा : इथेनॉलमिश्रित इंधन वापरल्याने वाहनांच्या इन्‍श्‍युरन्स कव्हरेजवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, असे विमा कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व चाचण्यांनंतरच पुढील निर्णय : पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय सर्व आवश्यक आणि कठोर तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल.

पर्यावरणपूरक पाऊल : इथेनॉल मिश्रण ही एक वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि पर्यावरणाला पूरक अशी मोहीम असून यामुळे देशाचे इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT