रायगड

Central Railway Action : मुंबईत मध्य रेल्वेची धडक कारवाई; दोन महिन्यांत ४.३० लाख विनातिकीट प्रवाशांकडून ३० कोटींचा दंड वसूल

तिकीट तपासणी मिळकतीत लक्षणीय वाढ

पुढारी वृत्तसेवा

रोहे : नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर जोरदार कारवाई केली आहे. मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते मे २०२६ या अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट प्रवासाच्या ४ लाख ३० हजार प्रकरणांमधून तब्बल ३० कोटी १३ लाख रुपयांची उल्लेखनीय दंड वसुली केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत २ लाख ७५ हजार प्रकरणांमधून १२ कोटी २ लाख रुपये वसूल करण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा रेल्वेच्या उत्पन्नात १५० टक्क्यांपेक्षा जास्त, तर एकूण प्रकरणांच्या संख्येत ५६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

केवळ मे महिन्याचा विचार केला तर, तिकीटविरहित प्रवासाच्या २ लाख २ हजार प्रकरणांमधून दंड म्हणून १४ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मागील वर्षी मे महिन्यात १ लाख ३० हजार प्रकरणांमधून ५ कोटी ९५ लाख रुपये वसूल झाले होते. यावरून यंदाच्या मे महिन्यात वसुलीत १३५ टक्के आणि कारवाईच्या प्रकरणांमध्ये ५६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून येते.

मेल, एक्सप्रेस आणि उपनगरीय (लोकल) गाड्यांमध्ये, विशेषतः द्वितीय श्रेणीच्या (सेकंड क्लास) डब्यांमध्ये वारंवार राबवण्यात आलेली तिकीट तपासणी मोहीम अत्यंत प्रभावी ठरली आहे. या गाड्यांमध्ये एप्रिल ते मे २०२६ या कालावधीत ३ लाख ४ हजार विनातिकीट प्रवाशांची प्रकरणे उघडकीस आली, जी मागील वर्षीच्या २ लाख २ हजार प्रकरणांपेक्षा ५० टक्क्यांनी जास्त आहेत. या प्रवाशांकडून २४ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, मागील वर्षीच्या १० कोटी १२ लाख रुपयांच्या तुलनेत ही जवळपास १४५ टक्क्यांची वाढ आहे. एकट्या मे महिन्यात या गाड्यांमधून १ लाख ४६ हजार प्रकरणांमधून ११ कोटी ७१ कोटी रुपये वसूल करण्यात आले. मागील वर्षी हाच आकडा ९७ हजार ४६ प्रकरणांमधून ५ कोटी ९१ लाख रुपये इतका होता.

अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि खऱ्या (वैध) प्रवाशांना सुखाचा प्रवास करता यावा म्हणून वातानुकूलित (AC) लोकल गाड्यांमध्येही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला रेल्वेला मोठे यश आले आहे. एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांत एसी लोकलमध्ये एकूण २५ हजार ९२४ अनियमित प्रवासाची प्रकरणे उघडकीस आली, जी मागील वर्षीच्या २१ हजार ८१ प्रकरणांच्या तुलनेत २३ टक्क्यांनी अधिक आहेत. या एसी लोकलच्या प्रवाशांकडून ८० लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मे महिन्यात एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३ हजार २२५ प्रवाशांकडून ४१ लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल झाला, जो मागील वर्षीच्या मे महिन्यातील ३४ लाख १५ हजार रुपयांच्या तुलनेत २१ टक्क्यांनी जास्त आहे.

याशिवाय इतर वर्गांमधील अनियमित प्रवास आणि विनानोंदणी सामानावरही रेल्वेने कडक कारवाई केली आहे. दोन महिन्यांत प्रथम श्रेणीच्या (फर्स्ट क्लास) डब्यांमधून विनातिकीट प्रवास करणारी २३ हजार ४४७ प्रकरणे पकडून ७४ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधील तिकिटांच्या भाड्याच्या फरकापोटी ५८ हजार ७४८ प्रकरणांमधून ३ कोटी ६१ लाख रुपये, तर नोंदणी न करता अतिरिक्त सामान नेणाऱ्या १७ हजार प्रकरणांमधून १९ लाख ४५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विनातिकीट प्रवासाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांची सुरक्षितता व सोय सुनिश्चित करण्यासाठी लोकल, एसी लोकल, एक्सप्रेस गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर सातत्याने ही विशेष मोहीम राबवत आहे. या कारवाईमुळे केवळ दंडच वसूल होत नाही, तर सर्वसामान्यांमध्ये तिकीट काढून प्रवास करण्याची शिस्तही निर्माण होत आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान होणारी गैरसोय आणि आर्थिक दंड टाळण्यासाठी नेहमी योग्य व वैध तिकीट खरेदी करूनच सन्मानाने प्रवास करावा. विनातिकीट प्रवासाबाबत रेल्वेचे धोरण हे 'शून्य-सहिष्णुता' (झिरो टॉलरन्स) असून, प्रवाशांना आरामदायक प्रवास देण्यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT