महादेव सरसंबे
रोहे : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत होणारी गर्दी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वे सरसावली आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री (१ जानेवारी २०२६ च्या पहाटे) मुख्य आणि हार्बर मार्गावर ४ विशेष उपनगरीय गाड्या चालवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशननंतर घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेने हा विशेष निर्णय घेतला आहे. या गाड्या मुख्य मार्गावर कल्याण ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी दरम्यान धावतील. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या सर्व स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत.
१. मुख्य मार्ग (CSMT - कल्याण - CSMT): सीएसएमटी - कल्याण: ही विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ०१:३० वाजता सुटेल आणि पहाटे ०३:०० वाजता कल्याणला पोहोचेल. कल्याण - सीएसएमटी: ही लोकल कल्याण येथून मध्यरात्री ०१:३० वाजता सुटेल आणि पहाटे ०३:०० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
२. हार्बर मार्ग (CSMT - पनवेल - CSMT): सीएसएमटी - पनवेल: ही विशेष गाडी सीएसएमटी येथून मध्यरात्री ०१:३० वाजता सुटेल आणि पहाटे ०२:५० वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेल - सीएसएमटी: ही गाडी पनवेल येथून मध्यरात्री ०१:३० वाजता सुटेल आणि पहाटे ०२:५० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
मध्य रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे की, नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद घेताना रेल्वेच्या या विशेष सेवांचा लाभ घ्यावा आणि आपला प्रवास सुरक्षित करावा. गर्दीच्या वेळी गोंधळ टाळण्यासाठी प्रवाशांनी वेळापत्रकाची नोंद घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.