नेरळ ः नेरळ ग्रामपंचाय कार्यालय व जिजामाता भोसले तलावासमोरील असलेल्या सिटी स. नं. 238 मधील नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीची असलेले 101 चौरस मीटर तथा एक गुंठ क्षेत्र आहे. या क्षेत्रावर महापुरुषांच्या स्मारक उभारण्याची मागणी ही नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली होती. या भूखंडाशेजारी एका इमारतीचे काम सुरू आहे .
इमारीतीच्या बांधकाम व्यावसायाकडून या भूखंडावर पत्र्याची शेड उभारून व बांधकाम साहित्य जमा केले आहे. ग्रामपंचायतीच्य भूखंडावर महापुरुषांच्या स्मारकाचे मागणी नागरिकांनी केलेली असताना त्या भूखंडावर बांधकाम साहित्य ठेवण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीचा भूखंड हा बांधकाम व्यावसायीकाकडून हडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.ग्रामपंचायत प्रशासकाने मात्र,असा प्रकार घडत असेल त्याचा जाब संबंधिताला विचारुन बांधकाम साहित्य अन्यत्र हलविण्याचे निर्देश देऊ,असे सुचित केले आहे.
मुख्य व जुनी बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले होते. त्या वेळेस या रस्त्यांच्या बाजूला येणार्या जागेच्या मोजण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळ ग्रामपंचायतीचे कार्यालय व जिजामाता भोसले तलावा समोरील चौकातून नेरळ कुंभारआळी व शंकर मंदिराकडून मारूती मंदिराकडे जाणार्या या दोन रस्त्यालगत असलेला सिटी स.नं. 238 या भूखंडाची देखील मोजणी करण्यात आली होती. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायतीला देखील नोटीस देण्यात आली होती.
या मोजणी दरम्यान या भूखंडामध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीची 101 चौरस मीटर तथा 1 गुंठा जागा ही ग्रामपंचायतीच्या मालकी निघाली होती. या जागेत छत्रपत्ती संभाजी महाराज यांच्या नावने नामफलक लावून चौक उभारणे व सुशोभिकरण करण्यासाठी मासिक व ग्रामसभेमध्ये चर्चा करून ठाराव मंजूर करण्यासाठी नागरिक संजय वसंत मनवे, संदीप नारायण उतेकर आदींच्या सह्यांचा अर्ज हा नेरळ ग्रामपंचायतीकडे केला होता. त्या नंतर झालेल्या ग्रामसभेमध्ये तो विषय देखील घेण्यात आला होता.
यावेळी ग्रामसभेमध्ये छत्रपत्ती संभाजी महाराज यांच्या नावासह अहिल्याबाई होळकर यांचे नाव देखील समोर आले होते. मात्र सिटी स. नं. 238 मधील ग्रामपंचायतीच्या मालकीची 1 गुंठा जागा सोडता इतर उर्वरित खाजगी जागेत इमारतीचे बांधकाम हे बांधकाम व्यावसायीकाकडून सुरू करण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायीकाकडून ग्रामपंचायतीच्या मालकी असलेल्या 1 गुंठा भूखंडावर अनधिकृत पत्र्याची शेड व बांधकाम साहित्य जमा करण्यात आले.
या भूखंडावर ग्रामसभेत महापुरुषांचे स्मारकाची मागणी केली असताना प्रशासनाकडून काही कार्यवाही दिसून येत नसल्याने, नेरळ ग्रामपंचायतीचा भूखंड हा बांधकाम व्यावसायीकाकडून हडपण्याचा प्रयत्न होत आहे का? असा प्रश्न संतप्त नेरळच्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. प्रशासन या संदर्भात बांधकाम व्यावसायीका विरोधात कार्यवाही करणार का? व सदर भूखंड हा ताब्यात घेणार का? असे प्रश्न देखील संतप्त नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.ग्रामस्थांचे लक्ष या भूखंडाकडे लागून राहिलेले आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबधीत बांधकाम व्यावसायीकाला बोलावून घेऊन त्याला सूचना करून सदर जागेची साफ सफाई करून, सदर जागेवर कंपाउंड घालून, नियोजीत ठरावानुसार नामफलक लावण्यात येईल.सुजित धनगर, प्रशासक, नेरळ ग्रामपंचायत.
राजमाता जिजाबाई भोसले तलावा समोरील सिटी स. नं. 238 मधील ग्रामपंचायतीच्या मालकीचा असलेले 1 गुंठा क्षेत्रात आम्ही ग्रामपंचायतीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा नामफलक लावण्याचे , चौक उभारण्याचे व सुशोभिकरण करण्या संदर्भातील चर्चा करून त्याचा ठराव हा मासिक किंवा ग्रामसभेत घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने त्वरित संबधित बांधकाम व्यावसायीका विरोधात उचित कार्यवाही करून सदर ग्रामपंचायतीचा भूखंड ताब्यात घ्यावा.संजय मनवे, माजी शाखा प्रमुख नेरळ