अलिबाग : अलिबागजवळच्या थळ गावा समोरील खांदेरी किल्ल्याजवळच्या खोल समुद्रात उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई नावाची मच्छिमारी बोट शनिवारी सकाळी साडेआठ वाजता बुडाली.
या बोटीतील पाच खलाशी खवळलेल्या समुद्रातून पोहत दुपारी साडेतीन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोडी किनारी सुदैवाने सुखरुप पोहोचले. तर तिघे खलाशी अद्याप बेपत्ता आहेत. दिघोडी किनारी पोहोचलेल्या पाच खलाशांकडून बोट बुडाल्याची माहिती मिळाल्यावर आपत्ती निवारण यंत्रणेच्या माध्यमातून शोधकार्य सुरु करण्यात आले असल्याची माहिती अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील व मांडवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली आहे.
बुडालेल्या बोटीतून दिघोडी किनारी पोहत आलेल्या पाच जणांमध्ये हेमंत बळीराम गावंड , (वय - 45 रा.आवरे ता. उरण ), संदीप तुकाराम कोळी (वय - 38 रा. करंजा ता . उरण ), रोशन भगवान कोळी (वय - 39 रा. करंजा ता. उरण) ,शंकर हिरा भोईर (वय - 64 रा. आपटा ता . पनवेल ), कृष्णा राम भोईर ( वय - 55 रा. आपटा ता . पनवेल ) यांचा समावेश आहे. यापैकी रोशन कोळी या तरुणाच्या डोक्याला जबर मार बसला आहे तर इतर चौघे किरकोळ जखमी असून त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
उरण करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई नावाची मच्छीमारी बोट ही करंजा येथून शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी हेमंत बळीराम गावंड , संदीप तुकाराम कोळी,रोशन भगवान कोळी ,शंकर हिरा भोईर , कृष्णा राम भोईर ,नरेश राम शेलार ,धीरज कोळी रा. कासवला पाडा उरण ,मुकेश यशवंत पाटील असे आठ खलाशी घेऊन भर समुद्रात निघाली होती.
सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही बोट खांदेरी जवळच्या खोल समुद्रात असताना आलेल्या जोरदार लाटांच्या मार्याने भरसमुद्रात उलटली. बोटीवरील चालक(तांडेल) रोशन भगवान कोळी यांच्यासहित आठ जण समुद्रात फेकले गेले. या आठ जणांपैकी हेमंत बळीराम गावंड हे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दिघोडी(मांडवा) समुद्र किनारी पोहत प्रथम आले. त्यांच्या मोगोमाग संदीप तुकाराम कोळी ,रोशन भगवान कोळी ,शंकर हिरा भोईर ,कृष्णा राम भोईर हे सुमारे अर्ध्या तासाच्या अंतराने पोहत दिघोडी समुद्र किनारी पोहोचले. त्याची माहिती मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना मिळताच त्यांनी पाच जणांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल केले आहे.
खलाशांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर - बुडालेल्या बोटीतील नरेश राम शेलार, धीरज कोळी आणि मुकेश यशवंत पाटील या तिघा बेपत्ता खलाशांचा शोध घेण्याकरिता थर्मल ड्रोन यंत्रणा पुणे येथून मागवले असून, ते येथे पोहोचताच रात्रीच शोध घेण्यात येणार आहे. सध्या खोल समुद्रात सुरु असलेला पाऊस आणि रात्रीची वेळ यामुळे हेलिकॉप्टर सर्च ऑपरेशन उद्या (रविवार) सकाळी सुर्योदयानंतर सुरु होणे अपेक्षित आहे.विक्रम पाटील, तहसीलदार