Suspicious items found Mahad
महाड : महाड नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे अघोरी कृत्यांची मालिका सुरू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. २ डिसेंबरला मतदान होणार असताना शहरातील चवदार तळे भागात संशयास्पद वस्तू सापडल्यामुळे उमेदवारांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चवदार तळे परिसरातील ट्युलिप नामक इमारतीच्या समोरच्या रस्त्यावर नारळ फोडून लाल कुंकू तसेच काही तांत्रिक साहित्य टाकल्याचे पहाटे नागरिकांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे लाल भोपळा, त्यावर कुंकू आणि काळी बाहुली ठेवलेली आढळली. या घटनांनी परिसरात चर्चांना सुरुवात झाली असून हे अघोरी प्रकार निवडणुकीशी संबंधित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
प्रचाराचा ताप वाढत असताना अशा प्रकारच्या कृतींमुळे नागरिकांमध्ये भीड-भयाचे वातावरण निर्माण होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या संदर्भात नागरिकांनी प्रशासनाने तातडीने चौकशी करून अशा प्रकारांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी केली आहे. निवडणूक प्रचाराच्या उतार-चढावात असा भीती पसरवणारा ट्रेंड सुरू होणे चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकाराविरोधात राष्ट्रवादी - भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तसेच पोलिसांकडे तक्रार देणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. तर आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड विभागात सुद्धा बुवाबाजीचे प्रकार सुरु झाले असून अनेक बुवा-बाबांना परिसरात फिरताना नागरिकांनी पाहिल्याचे समजते.