कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीतील भिसेगाव येथे कुत्र्यांनी अक्षरशा उच्छाद मांडला आहे. नागरिकांना त्यांच्यापासून बचाव करत चालणे हे मुश्किल झाले आहे. त्यामुळे येथील संतप्त महिलांनी या कुत्र्यांवर कार्यवाही व्हावी तथा या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी कर्जत नगर परिषदेकडे तसेच कर्जत पोलीस ठाण्यातही निवेदन सादर केले आहे. नागरिकांना चोरापासून नव्हे तर कुत्र्यांपासून संरक्षण द्याअशी म्हणायची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
कुत्र्यांचे रात्रभर भुंकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे, लहान मुलांवर हल्ला करणे, पादचा़र्यांवर गुरगुरणे या त्यांच्या दिनक्रमामुळे नागरिक हतबल झाले आहे. नगरपरिषद प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी भिसेगावातील महिलांनी नगरपरिषद आणि पोलिस ठाण्यात जाऊन रवी लाड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जर वेळेत बंदोबस्त केला नाही तर 15 ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्यात येईल असा इशारा नारीशक्ती संघटनेच्यावतीने ज्योती जाधव, सविता गायकर,नूतन शेख ,संगीता कडू,पल्लवी ठाकरे, छाया सारंग,चांदणी पिंगळे ,रुपाली जोशी, हेमांगी पवार, ममता पवार, स्नेहल ठाकूर,सुनीता खाडे, चित्रा सोनावणे, आशा वाल्मिकी, मनीषा हजारे, रंजना हजारे, ज्योती लोधी,सारिका मोरे, हिराबाई जाडकर यांनी दिला आहे.
भटक्या कुत्र्यांना सदरील व्यक्ती खाद्य खायला घालत असेल तसेच अशा व्यक्तींमुळे नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांना समज देऊन योग्य ती कारवाई केली जाईल.संदीप भोसले, पोलीस निरीक्षक
कुत्र्यांना खाद्य टाकताना आढळून आल्यास अथवा माहिती मिळताच त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल.रवी लाड, नगरपरिषद कर्जत
या कुत्र्यांमुळे आमचे गाड्यांची सीट कव्हर फाडले जाते तसेच फ्लॅट बाहेर घाण केली जाते यामुळे दुर्गंधी फसले जाते व किटाणू निर्माण होते तसेच कचरा विस्कटून घाण पसरवली जात आहे. यामुळे बाहेर पडणे देखील कठीण झाले असून भीतीचे वातावरण पसरले आहे.सविता गायकर, नागरिक भिसेगाव