रायगड : रायगडात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपेक्षा भाजपसमवेत युती करुन निवडणुका लढवू, असा सूचक इशारा रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिला आहे.
गोगावले यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवाव्यात असे वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच सुचित केले आहे. पण राष्ट्रवादीसमवेत आमचे पटत नाही, हे जग जाहीर आहे. शिवाय जागा वाटपावरुनही मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे राष्ट्रवादीशी युती नकोच असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे. राष्ट्रवादीपेक्षा भाजपसमवेत आघाडी करायला आम्ही तयार आहोत. पण तेही सोबत आले नाहीत तर स्वबळावरही निवडणुका लढवू, असा इशाराही गोगावले हे देताना दिसत आहेत. अजून महायुतीत चर्चा सुरू आहे. त्यातून काय निष्पन्न होते हे पाहून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ,असेही त्यांनी सुचित केलेले आहे. जिथे शक्य आहे तिथेच मित्रपक्षांसमवेत युती, आघाडी करा, असे यापूर्वीच सुचित केल्याचेही ते निदर्शनाला आणत आहेत.
रायगडमध्ये युतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पसंती दिली आहे. आगामी निवडणुकीत शिंदेसेनेला सोबत न घेता भाजपसोबत युती करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी बैठकीत केला. तर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक नेत्यांना युतीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्याचं सांगण्यात येती. त्यामुळे रायगडमधील स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तरी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर नेमके चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. मंत्री गोगावलेंसह आ. महेंद्र दळवी, आ.महेंद्र थोरवे यांचा पूर्वीपासूनच खा.सुनील तटकरे यांना कडवा विरोध राहिलेला आहे. त्या विरोधाला राष्ट्रवादीकडूनही चोख उत्तर दिले जात असल्याने मित्रपक्षातील हा संघर्ष चिघळत चालला आहे.