म्हसळा ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्षांचे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते यांची फोडाफोडी न करण्याच्या सक्तसूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलेल्या असतानाही बुधवारी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी म्हसळा नगरपंचायतीमधील नगराध्यक्षासह नऊ नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मित्रपक्षात वातावरण बिघडणार आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या म्हसळा नगरपंचायत येथील नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांचेसह एकूण नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना झालेला हा मोठा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांना बसलेला जोरदार राजकीय धक्का म्हणून पाहिला जात आहे. या प्रवेशामागे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे मानले जाते.
नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह नऊ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने श्रीवर्धन मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
प्रवेश केलेले नगरसेवक
नगराध्यक्ष फरीन अब्दुल अजीज बशारत, असहल असलम कादरी ,सोमय्या कासिम आमदानी, सईद जंजीरकर , जबीन नदीम दळवी , कमल रवींद्र जाधव,सारा अब्दुल कादरी,राखी अजय करंबे,सुफियान इकबाल हळदे,नसीर अब्दुल रहीमान मिठागरे सर्व नगरसेवक
पक्ष प्रवेशाबाबत गुप्तता
म्हसळा नगरपंचायत मध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असताना देखील तटकरे यांचे कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पदे उपभोगणारे नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे मागचे कारण गुलदस्त्यात आहे. नगरसेवकांचे पक्ष प्रवेशाबाबत भरतशेठ गोगावले व म्हसळा तालुका शिवसेना पक्षाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या इतर नगरसेवकांना या नाट्यमय घडामोडीबाबत कल्पना नसणे हा देखील म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे.