जंतदोषामुळे बालकांना अ‍ॅनिमियाचा धोका  
रायगड

Anemia In Children | सावधान ! जंतदोषामुळे बालकांना अ‍ॅनिमियाचा धोका

रायगडात उद्या जंतनाशक मोहीम ; साडेपाच लाख गोळ्यांचा डोस

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग | लहान बालकांमध्ये जंतदोषाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केेंद्रीय आरोग्य विभागाने 4 डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम आयोजित केली आहे. जंतदोषाने बालकांना अ‍ॅनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो तो टाळण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात एक वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील 5 लाख 85 हजार 7 मुलामुलींना बुधवारी (दि.4) जंतनाशक गोळ्या देण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. 3 हजार 242 शाळा, 3 हजार 151 अंगणवाड्यांमधून जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जंतनाशक गोळ्या देण्याची मोहिम यशस्वी करण्याकरिता ग्रामीण भागातील एकूण प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका सहभाग नोंदविणार आहेत. तसेच शहरी भागामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय यांच्यामार्फतही मोहीम राबविण्यात येणार आहे.

ज्या मुलामुलींना कोणत्याही कारणाने 4 डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी मिळाली नाही तर, त्यांना 10 डिसेंबर रोजी मॉप-अप राऊंडच्या वेळी गोळी देण्यात येणार आहे. 1 वर्ष आतील बालकांना गोळी देण्यात येऊ नये, 1 वर्ष ते 2 वर्ष वयोगटातील बालकांना अर्धी गोळी पाण्यातून देण्यात यावी, तसेच 2 ते 19 वयोगटातील मुलांनी एक गोळी चावून खाल्यानंतर त्यांना पाणी द्यावे अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तरी या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी केले आहे.

जंतनाशक गोळी खाल्याने होणारे लाभ

1. जंतनाशक गोळी खाल्ल्याने रक्तक्षय कमी होतो.

2. बालक आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे शाळेतील उपस्थिती वाढते.

3. मुले क्रियाशील बनतात व मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्य चांगले राहते.

4. अल्बेडझोल च्या एका गोळीमुळे जंताचा नाश होण्यास मदत होते.

भूक मंदावणे, उलट्या, अतिसाराची शक्यता

जंत दोषामुळे बालकांमध्ये अ‍ॅनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो शिवाय आतड्यांना सूज येणे, पोटदुधी, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार तसेच इतर आजार उद्भवतात. या आजारांना आळा घालण्यासाठी वर्षातून दोन वेळा बालकांनी जंतनाशक गोळी घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT