रायगड : रायगड जिल्हयात पुन्हा एकदा पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. जिल्हयातील पर्यटन स्थळांवर हजारो पर्यटक दाखल होत आहेत. जिल्हयातील मुख्य समुद्र किनारे, धार्मिक पर्यटन स्थळे, माथेरान येथे पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. वाढत्या पर्यटकांमुळे पर्यटन व्यावसायीकांचे व्यवसाय तेजित आले आहेत. आगामी एक महिनाभर हा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरु राहणार आहे.
रायगड जिल्हा हा आता पर्यटन जिल्हा म्हणून नावारुपाला आला आहे. रायगड जिल्हयातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, नागाव, रेवदंडा, मुरुड तालुक्यातील काशिद, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर आदी समुद्र किनारपट्टी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. या समुद्र किनार्यांवरील उंट सवारी, एटीव्ही वाईक, घोडागाडी, सायकल, बनाना राईड, स्पीड बोट, पॅरासिलींग या सारखे साहसी खेळ पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. साहसी खेळ खेळतानाच किनार्यावरील विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणे यामुळे समुद्र किनार्यांवरील पर्यटन राज्यभरातील पर्यटकांनी आनंददायी ठरत आहे.
वाढत्या पर्यटनामुळे किनारपट्टी भागात वैशिष्टयपूर्ण अशी खाद्य संस्कृती निर्माण होत आहे. रायगड जिल्हयातील ताजी मच्छी हे पर्यटकांची आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. कोणत्या भागात मच्छीचे चांगले जेवण मिळते याचा शोध पर्यटक घेताना दिसतात. काही पर्यटक वारंवार येथे येत असल्याने मागचा अनुभव विचारात घेऊन ठराविक हॉटेल आणि कॉटेजला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. काही पर्यटक परतीच्या प्रवासात मच्छी मार्केटमध्ये जाऊन तेथे मच्छी खरेदी करून पॅकींग करून घरी घेऊन जाताना दिसत आहेत. रायगडच्या किनारपट्टी भागात मच्छी हा घटक पर्यटनाचा प्रमुख मुद्दा ठरत असल्याने पर्यटकांपर्यत स्थानिक मच्छी पोहचण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. ओल्या मच्छीसह सुक्या मच्छीलाही मोठी मागणी आहे.
जिल्हयाच्या किनारपट्टी भागात हॉटेल आणि कॉटेजेसचा व्यवसाय आता चांगलाच बहरला आहे. अलिबाग तालुक्यातील वरसोली, किहीम, नागाव आणि चौल, मुरुडमधील काशिद, मुरुडमध्ये ठिकठिकाणी कॉटेजेस तयार झाले आहेत. यातून मोठी व्यावसाय निर्मिती झाली आहे, शिवाय यातून स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होत आहे.
रायगड जिल्हयाला वैभवशाली इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जिल्हयात अनेक गड-किल्ले आहेत. त्यामुळे इतिहासप्रेमींसह सर्वसामान्य पर्यटकही गडकिल्ले पहाण्यासाठी जिल्हयात दाखल होत आहेत. जिल्हयात अनेक गड-किल्ले हे भग्नावस्थेत आहेत. त्यामुळे या इतिहासाचा खुणांची चांगल्याप्रकारे जतन झाल्यास देशविदेशातील पर्यटकही मोठ्या प्रमाणात येथे येऊ शकतात.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असले तरी त्यांना आवश्यक सुविधा मिळत नाही. चांगले रस्ते उपलब्ध नाहीत. रस्ते चांगले नसल्याने शहरी भागात पर्यटकांना कोंडीचा सामना करावा लागतो. धार्मिक, ऐतिहासिक स्थळे, समुद्र किनारे येथे पर्यटकांना सुसज्ज अशी प्रसाधनगृह नाहीत. काही तालुक्यांत वीजेची समस्या आहे.