बल्लाळेश्वर तलावात फुलला बदकांचा संसार  pudhari photo
रायगड

Raigad News : बल्लाळेश्वर तलावात फुलला बदकांचा संसार

पहिल्यांदाच आडई बदकाच्या जोडीने घातली वीण, 5 पिल्लांना दिला जन्म

पुढारी वृत्तसेवा

पनवेल ः राजेश डांगळे

पनवेलच्या बल्लाळेश्वर तलावात एका नव्या जोडप्याने आपला संसार थाटला आहे. समृद्ध नैसर्गिक जैवविविधता लाभलेल्या या जलाशयात अडई बदकाच्या जोडीने प्रथमच वीण घातली असून, या छोट्या,छोट्या पिल्लांसह ही जोडी विहार करत असल्याचे सुखद दृष्य सध्या अनुभवास येत आहे.शेकडो निसर्गप्रेमी या बदकांचा विहार डोळे भरुन पहात आहेत.

या तलावाची खरी ओळख त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि समृद्ध जैवविविधतेमुळे आहे. अंदाजे 20-25 वर्षांपूर्वी, या तलावातील पक्ष्यांची पहिली अधिकृत यादी तयार करण्यात आली होती, ज्यात अंदाजे 120 प्रजातींची नोंद केली गेली होती. हे आकडे तलावाची पर्यावरणीय संपन्नता दर्शवतात. मात्र, गेल्या काही वर्षांत गाळ काढण्याच्या बहाण्याने करण्यात आलेल्या काही कामांमुळे येथिल समृद्ध जैवविविधता धोक्यात आली होती. चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामांमुळे नैसर्गिक अधिवासाला धक्का बसला आणि पक्ष्यांच्या वास्तव्यावर नकारात्मक परिणाम झाला.

असे असले तरी, निसर्गाने आपली लवचिकता दाखवली आहे. गेल्या काही वर्षांत, तलावातील परिस्थिती सुधारत असल्यामुळे अनेक पक्ष्यांनी नी पुन्हा तलावात वीण करायला सुरुवात केली आहे. ही एक अत्यंत दिलासा देणारी आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. जांभळी पाणकोंबडी, पाणमोर, रंगीत पाणलावा, टिटवी, जकाना अशा अनेक सुंदर पक्ष्यांनी तलावात आपली घरटी बांधून पिलांना जन्म देण्यास पसंती दिली आहे. या वर्षी तर पहिल्यांदाच आडई बदकांची 5 पिल्ले पनवेल येथील पक्षी निरीक्षक माधव आठवले यांना दिसली, हे विशेष उल्लेखनीय आहे. या पक्ष्यांनी तलावात पहिल्यांदाच वीण घातली आहे, जे तलावाचे पर्यावरणीय आरोग्य सुधारत असल्याचे स्पष्ट संकेत देते.

तलावीय पर्यावरणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण पक्ष्यांची वीण हा कोणत्याही पाणथळ जागेच्या आरोग्याचा एक प्रमुख निर्देशांक असतो असे माधव आठवले यांनी सांगितले. या गंभीर विषयावर लक्ष वेधण्यासाठी आणि तलावाच्या संरक्षणासाठी अनुभूती ही संस्था गेल्या 4 वर्षांपासून मनपाशी संपर्कात आहे. त्यांनी योग्य मार्गदर्शन करण्याचा आणि उपाययोजना सुचवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. मात्र, खेदाची बाब अशी की, संबंधित अधिकारी काही केल्या लक्ष देत नाहीत, ज्यामुळे या महत्त्वपूर्ण नैसर्गिक वारशाचे भवितव्य धोक्यात आले आहे. या संदर्भात सुदीप आठवल यांनी तलावाचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे सांगीतले.

तलाव पर्यावरणाचा घटक

पनवेल शहराच्या मध्यभागी स्थित असलेला बल्लाळेश्वर तलाव केवळ एक जलाशयापेक्षा अधिक आहे; तो पनवेलकरांच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे. पेशवेकालीन इतिहासाशी जोडलेला हा तलाव अनेक वर्षांपासून पनवेल शहराला जीवनदायिनी पाणी पुरवठा करत आहे. या तलावातील प्रचंड पाणीसाठा आजही पनवेलमधील अनेक बोअरवेल्सना पाणी पुरवण्याचे महत्त्वाचे काम करतो, जो भूजल पातळी राखण्यात त्याची भूमिका अधोरेखित करतो.

या अनमोल नैसर्गिक ठेव्याचे नैसर्गिकरित्या संरक्षण होणे खूप गरजेचे आहे. तलावाभोवती असलेली जैवविविधता जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, सध्या तलावावर अनेक अतिक्रमणे होत आहेत, जी या नाजूक पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण करत आहेत. ही अतिक्रमणे त्वरित थांबायला हवीत.
माधव आठवले, पक्षी निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT