कुक्कुटपालन शेड कोसळल्याने गावठी कोंबड्याही दगावल्या Pudhari
रायगड

Raigad Flood | बाहे येथे पुराच्या पाण्याने बकरीशेड जलमय; ७ बकऱ्यांसह गावठी कोंबड्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

कुक्कुटपालन शेड कोसळल्याने गावठी कोंबड्याही दगावल्या

पुढारी वृत्तसेवा

Bahe Village Flood Raigad

कोलाड : रोहा तालुक्यातील बाहे गावात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा मोठा फटका शेतकरी राजेश पांडुरंग थिटे यांना बसला आहे. महिसदरा नदीला आलेल्या पुराचे पाणी त्यांच्या बकरीशेडमध्ये शिरल्याने सहा ते सात बकऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच शेजारील कुक्कुटपालन शेड कोसळल्याने गावठी कोंबड्याही दगावल्या असून या दुर्घटनेत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज वर्तविला जात असताना जून महिना जवळपास कोरडाच गेला होता. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सलग पाच-सहा दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून, रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कुंडलिका आणि महिसदरा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर रविवारी (दि. ५) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास महिसदरा नदीच्या तीरावर असलेल्या राजेश थिटे यांच्या बकरीशेडमध्ये पुराचे पाणी घुसले. त्या वेळी शेडमध्ये सुमारे ६० ते ७० बकऱ्या होत्या. त्यापैकी सहा ते सात बकऱ्या पुराच्या पाण्यात मृत्युमुखी पडल्या.

याच परिसरातील कुक्कुटपालन शेडही कोसळल्याने काही गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाला. पावसाळ्यामुळे बॉयलर कोंबड्यांचा साठा नसल्याने संभाव्य मोठे नुकसान टळले असले, तरी बकऱ्या व गावठी कोंबड्यांच्या मृत्यूमुळे शेतकरी राजेश थिटे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शासनाने योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजेश पांडुरंग थिटे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT