Atal Setu Incident Pudhari
रायगड

Atal Setu Incident: जेवायला जातो म्हणत घराबाहेर पडला अन् परतलाच नाही; अटल सेतूवरून उडी मारून जीवन संपवलं!

या घटनेची नोंद उलवे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

उरण: अटल सेतू मार्गावरील पुलावरून पुण्याच्या एका तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतिक सुभाष रासकर (वय २८) या तरुणाने रविवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून समुद्रात उडी मारली. या घटनेची नोंद उलवे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

प्रतिक रासकर हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी असून, तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित व्यवसाय करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी त्याने कुटुंबीयांना बाहेर जेवणासाठी जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. पुढे त्याने आपली कार अटल सेतूवर उभी केल्यानंतर समुद्रात उडी मारल्याची माहिती तपासा दरम्यान समोर आली.

घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. समुद्र परिसरात तसेच किनारपट्टी भागात शोधकार्य सुरू असून अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.

पोलिस तपास सूरु

अटल सेतू हा प्रवासादरम्यानचे अंतर कमी करणारा सुविधेचा सेतू झाला असतानाच, या सेतूवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या करण्याच्या घटना या सेतूच्या उद्‌घा‌ट‌नानंतर काही महिन्यातच सुरु झाल्या आहेत. रविवारची ही घटना या सेतूवरील सहावी घटना असल्याची माहिती या निमित्ताने प्राप्त झाली आहे. उलवे पोलिसांकरिता हा चिंतेचा विषय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT